विद्यार्थी भारतीने पंतप्रधानांच्या नावे केली काकड आरती

भिवंडीः कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यावर निर्णय होत नसल्याने विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी या आमरण उपोषणास बसल्या असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असताना या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे काकड आरती करून केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा रद्द करण्याबाबत चकार शब्दही काढत नसल्याने या सरकारला कोरोना काळात नवे शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी वेळ आहे. मात्र लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ नसल्याने त्याचा निषेध या माध्यमातून करण्यात येत असल्याचे मंजिरी धुरी यांनी स्पष्ट केले. पदवी व पदव्युत्तर परीक्षेची सक्ती रद्द करावी,पंतप्रधान नरेंद्र मोदी व विद्यपीठ अनुदान आयोगाला जाग येऊ दे होय ‘ महाराजा ‘अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींनी वटहुकूम काढावे असे  आवाहन केले.जोपर्यंत वटहुकूम काढून परीक्षा रद्द होत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही, असे वक्तव्य विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले आहे.