दिव्यांग विद्यार्थ्याला विजय तरुण मित्र मंडळ घेणार दत्तक

कल्याण : कल्याणच्या(kalyan) रामबागेतील विजय तरुण मंडळाने(vijay tarun mandal) सामाजिक बांधिलकी जपली असून, यावर्षी मंडळाने बिर्ला महाविद्यालयातील एका दिव्यांग विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक(educational adoption) घेतले आहे व त्याला रोख ५० हजारांची मदत केली.

विजय तरुण मंडळाचा श्री गणेशोत्सवाचा देखावा हा गेली कित्येक वर्षे कल्याणकरांचे आकर्षण ठरला आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणपतीबरोबरच सामाजिक वसा जपत असतांना विजय तरुण मंडळाने गेली काही वर्षे सातत्याने समाजातील विविध घटकांना मदत केली आहे. मग जात्यंधाच्या हल्यात बळी पडलेले भिवंडीतील तीन पोलीस असो वा देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकांचे कुटुंब असो, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातील दिवा उजळत ठेवण्याचा प्रयत्न असो. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळे करुन दाखवत समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श उभा केला आहे.

यंदा विजय तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे ५७वे वर्ष असून कोरोना महामारीच्या काळातही लोकमान्य टिळकांनी दिलेल्या सामाजिक बांधिलकीचा वसा जपण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. बिर्ला महाविद्यालयातील बारावी कला शाखेत ९९.५०टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला श्रीकांत घुगे या दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व ५० हजारांचा धनादेश देवून गौरव करण्यात आला. तसेच त्याला शैक्षणिक दत्तक घेण्याची मंडळाची योजना आहे. गुरुवारी सायंकाळी दत्तगुरु मंदिर, रामबाग कल्याण येथे झालेल्या छोटेखानी सोहळ्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, डॉ. गौतम गणवीर, डॉ. दिपिका गणवीर यांच्याहस्ते श्रीकांत घुगे या विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. तसेच श्रीकांतचे आई वडील आणि बहिणीचा सन्मानदेखील यावेळी करण्यात आला. मंडळाचे विश्वस्त शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी हे कोरोनाग्रस्त असतानादेखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष नदीम आगा, भिकू बारस्कर, भागवत बैसाणे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

विजय तरुण मित्र मंडळाने केलेल्या मदतीने आपण भारावून गेलो असून त्यांच्या या मदतीचा योग्य वापर करून आगामी काळात आय.ए.एस बनण्याचा निर्धार श्रीकांत घुगे(shrikant ghuge) या विद्यार्थ्याने केला आहे.