कल्याण डोंंबिवलीत राबविली जाणार ‘विसर्जन आपल्या दारी’ संकल्पना

कल्‍याण :  कोरोना साथीच्‍या आपत्‍कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी ‘विसर्जन आपल्‍या दारी’  ही संकल्‍पना यावर्षीही राबविणार असल्याची माहिती पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली. महापालिका क्षेत्रातील पोलीस अधिकारी, महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त, महापालिका उपायुक्‍त, तहसिलदार कल्‍याण, तसेच प्रभागक्षेत्र अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत गणेशोत्‍सवाच्‍या प्राथमिक तयारीबाबत आयोजिलेल्‍या ऑनलाईन बैठकीमध्‍ये त्यांनी ही माहिती दिली.

कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्‍या गणेशोत्‍सवात विसर्जन स्‍थळे तसेच शासनाच्‍या गाईडलाईन्‍सप्रमाणे मंडपांची उभारणी व इतर बाबींबाबत या बैठकीमध्‍ये चर्चा झाली. कोकणात गणपतीसाठी जाणारे अनेक लोक यावर्षी कोकणात न जाता त्यांच्या राहत्‍या घरात गणपती आणणार असल्‍यामुळे खाजगी, घरगुती गणपतींची संख्‍या वाढू शकणार असल्‍याची शक्‍यता डोंबिवलीचे सहा. पोलीस आयुक्‍त मोरे यांनी व्‍यक्‍त केली. सार्वजनिक गणपती मंडळांच्‍या विसर्जनासाठी सॅनिटायझेशनची आवश्‍यकता लागेल. त्‍याचप्रमाणे स्वयंसेवकही तयार ठेवावे लागतील, त्‍यासाठी पूर्व तयारी करण्याबाबत पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावर्षी देखील गणेशोत्‍सव मंडळांच्‍या लागणाऱ्या परवानगीसाठी महापालिकेच्या एस.ओ.पी. प्रमाणे एक खिडकी योजना सर्व संबंधित पोलीस स्‍थानकांमध्‍ये कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्तांनी उपस्थितांना दिली. यावर्षीच्‍या गणेशोत्‍सवासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्‍सव साजरा करणेबाबत सर्व गणेश मंडळांच्‍या पदाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.