वटार ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

वसई: वसई(vasai) पश्चिम वटार येथे शेत शिवारात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे भराव केल्यामुळे पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती(flood situation) निर्माण होते. शेतात गावात व घराघरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे गावकऱ्यांना शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार वर्षांपासून पाणी साचत असल्यामुळे मोठे आर्थिक संकटही नागरिकांना सहन करावे लागले. प्रशासन या सर्व घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वटार ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी दहा ते सहाच्या दरम्यान लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

वटार ग्रामस्थांची ही समस्या मागील चार वर्षांपासून  जैसे थे आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा का काढला जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. वटार येथील सर्व्हे क्रमांक ७८ उंबर गोठणे ते नवापूर या रस्त्याच्या लगतची शेती शेतकऱ्यांनी बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांना विकली. शेकडो वर्षांपासून पावसाचे पाणी या शेती शिवारातून आगाशी मार्गे वैतरणा खाडीत जाऊन मिळते. मात्र आता तिथे पाच फूट जागा ठेवून व मोठ्या प्रमाणात भराव करून नैसर्गिक रचनेत बदल केला गेला म्हणून अशा प्रकारचा प्रसंग दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांवर येतो. पावसाळी पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून फार्म व्ह्यू बार अॅन्ड रेस्टॉरंट या वादग्रस्त बांधकामावर कारवाई करून पाण्याच्या निचरा करण्याचा आदेश बोर्डिंग कार्यालयाचे उपायुक्त रितेश किनी यांना दिला. मात्र मागील दहा दिवसांपासून अधिकारी कारवाई करण्यास चालढकल करत आहेत. हॉटेल मालकास पाण्याचा निचरा करण्यास सांगत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून वारंवार तक्रार करूनही या परिसरातील २४०० ग्रामस्थांना ताटकळत ठेवत आहेत. दोन ते अडीच महिन्यापासून गावात व शेतीत दोन फूट पाणी वाचलेलं आहे. वटार व परिसरातील ग्रामस्थांचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेती असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामस्थ बांधकाम व्यवसायिकांशी हुज्जत घालू शकत नाहीत. कारण त्यांची दहशत आहे म्हणून खासदार राजेंद्र गावित मनपा आयुक्त व तहसीलदारांनी यांनी याकडे विशेष लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी व वटार ,दोन तलाव ,रुमाव आळी, जेलाडी दत्त मंदिर, ओडलो, करदा खाल येथील स्थानिक रहिवाशांना व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.