महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर काढू – मुख्यमंत्री

कल्याण : एकजिनसीपणे संघटितपणे कोरोना निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना येथे कोरोना रुग्णांसाठी समर्पित कोरोना रूग्‍णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करताना त्‍यांनी हे वक्तव्य केले.

गणपतीच्‍या आगमनानंतर आधीची विघ्‍ने नष्‍ट होतात. तसेच कोरोनाचे संकटही नष्‍ट व्‍हावे, ही गणराया चरणी प्रार्थना, असे उद्गार त्‍यांनी यावेळी काढले. मुंबईत आता हायथ्रुपुट ही लॅब सुरू झाली असुन त्‍यामध्‍ये एका दिवसात १२०० टेस्‍ट होतात व कमीत कमी मानवी संपर्क राहतो, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली. असिम्‍प्टोमॅटिक रुग्णालादेखील व्‍यवस्थित आयसोलेशन करणे गरजेचे आहे. कोरोनाशी लढण्‍यापेक्षा त्‍यापासून दुर राहणे आपले हाती आहे, गावागावात कोरोनाबाबत दक्षता कशी घ्‍यावी याची जनजागृती करावी, म्‍हणजे कोरोनाची काळजी करण्‍याची आवश्‍यकता नाही, असेही ते यावेळी म्‍हणाले.

कोरोनाशी लढुन हरविण्‍यापेक्षा कोरोना होणारच नाही, यासाठी शक्‍यतोवर काळजी घ्‍यावी, देशात ठाणे महापालिकेचा रिकव्‍हरी रेट ८९ टक्‍के व कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिकव्‍हरी रेट ८५ टक्‍के आहे, हे दिलासादायक चित्र असल्‍याचे उद्गार उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी या ऑनलाईन लोकार्पण सोहळयावेळी काढले. डोंबिवली जिमखान्‍यातील कोविड रूग्‍णालय ही एक अप्रतिम व्‍यवस्‍था असल्‍याचे राज्‍याचे आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी या ऑनलाईन सोहळयात सांगितले.

अतिशय कमी वेळात एमएमआर क्षेत्रात अनेक सुविधा कोविडसाठी सुरू केल्‍या आहेत. कोविड रिकव्‍हरीमध्‍ये ठाणे महापालिकेचा राज्‍यात प्रथम क्रमांक असून कल्याण डोंबिवलीचा क्रमांक दुसरा असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

या कोविड रुग्‍णालयात ७० बेड आयसीयू, ५१ बेड ऑक्‍सीजन सुविधा उपलब्‍ध असणार असून त्‍यातील ३ बेड डायलिसीस रुग्‍णांकरीता राखीव ठेवण्‍यात आलेले आहेत. याव्‍यतिरिक्‍त ३० व्‍हेंटीलेटर  आणि ५ ऑक्सिजन मशीन सुविधादेखील उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. या रुग्‍णालयात रुग्‍णांसाठी अत्‍याधुनिक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून संपूर्ण रूग्‍णालय हे वातानुकुलित व इंटरनेट सुविधायुक्‍त आहे. त्‍याचप्रमाणे रुग्‍णांसाठी खास सुरेल संगीताची व्‍यवस्‍थादेखील करण्‍यात आलेली आहे.

या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्‍हाण, महापौर विनिता राणे तसेच इतर पालिका सदस्‍य, महापालिका अधिकारी/कर्मचारी , डोंबिवली जिमखान्‍याचे मोकाशी व इतर मान्‍यवर डोंबिवली जिमखाना येथे उपस्थित होते.