कामाठीपुऱ्यातील महिलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना बांधली राखी

मुंबई: सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई या संस्थेतर्फे ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या वंचित भगिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राख्या बांधल्या. काल दुपारी १.३० वाजता वांद्रे येथील आठवलेंच्या संविधान बंगल्यावर हा कार्यक्रम झाला. यावेळी साईचे संस्थापक अध्यक्ष विनय वस्त, ट्रान्सएशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंड्स्ट्रीचे अध्यक्ष संजय भिडे आणि हरिश केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘दिल में होता है चंदन, हम मनाते है रक्षाबंधन’ अशी सुरुवात करत रामदास आठवले यांनी या महिलांच्या पाठिशी भाऊ म्हणून उभं राहण्याचं आश्वासन दिलं. साई संस्थेच्या मुलांना महानगरपालिका शाळेत निवारा मिळावा या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. गेले ४ महिने ८ दिवस साई संस्था या महिलांना अन्नदान करत आहे याचे विशेष कौतुक आठवलेंनी यावेळी केले. साई संस्था आणि संस्थापक विनय वस्त यांचेदेखील त्यांनी कौतुक केले.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आमच्या पाठिशी आहेत. त्यांनी साईच्या दिदीना दिलेला विश्वास खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाची भेट आहे, साईचे संस्थापक विनय वस्त म्हणाले.

सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई ही संस्था देहविक्रय करणाऱ्या महिलांचा उत्कर्ष व पुनर्वसनाचे कार्य करते. समाजानेच तयार केलेला आणि वंचित ठेवलेला हा घटक. या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साई संस्था नेहमी. प्रयत्नशील असते. यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन देखील केले जाते. यापैकी एक उपक्रम म्हणजे ‘रक्षाबंधन’. समाजातील प्रतिष्ठित आणि प्रभावशील व्यक्तीला या दिवशी बंधू म्हणून निमंत्रित केले जाते. या वंचित भगिनी आपल्या या बंधूला औक्षण करुन राखी बांधतात, असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते. १९९१ पासून हा उपक्रम साई संस्था राबवित आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करुन हा कार्यक्रम पार पडला.