सैन्य भरतीसाठी तरुणाईने वेळ द्यावा – राजन राऊत

महाड: शूर आणि वीरांची भूमी असा वारसा असणाऱ्या रायगडच्या पवित्र भूमीतून देशसेवेसाठी सैन्यात भरती होणाऱ्या युवकांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याची खंत व्यक्त करीत देशसेवा करण्यासाठी सैन्यात भरती होण्याकरीता युवा पिढीने आपल्या आयुष्यातील केवळ ५ मिनिटे दिली तर त्यांच्या जन्माचे सार्थक होईल असे आवाहन महाड सरेकर आळी येथे भारतीय सैन्य दलातून सुट्टीवर आलेले जवान राजन राऊत यांनी केले आहे.राजन राऊत भारतीय सैन्य दलातून सुट्टीवर आपल्या महाड सरेकर आळी येथील घरी आले होते. ते बजावत असलेल्या देशसेवेबद्दल कृतजता व्यक्त करण्यासाठी सरेकर आळीमधील श्री शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने राजन राऊत यांचा श्री महाकालेश्वर मंदीरामध्ये छोटेखानी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केेले.

महाड शहरात भाजीचा व्यवसाय अशी कुटुंबीय परंपरा असणाऱ्या राऊत कुटुंबियांतील रवींद्र राऊत यांचा ज्येष्ठ सुपुत्र राजन राऊत याला आपल्या आईचे माहेर असलेल्या आणि महाड तालुक्यातील फौजी अंबावडे या गावाप्रमाणे सैनिक परंपरा असलेल्या मिल्ट्री अफसिंगे या गावातील असलेली प्रत्येक कुटुंबातील सैनिकी परंपरा आणि आईच्या माहेरातील कुटुंबातील आजोबांपासून मामांपर्यत सर्वच जण करीत असलेली देशसेवा , मामाच्या गावाची असणारी ओढ आणि त्यातून निर्माण झालेली देशसेवेची आवड यामुळे राजन यांना इंजिनीअरिंगकडे वळूनही सैन्य भरतीचा मोह आवरता आला नाही.

सैन्य भरतीच्या दुसऱ्या संधीत निवड झाल्यानंतर त्यांचे ६ महिन्याचे ट्रेनिंग जबलपूर येथे झाले या ठिकाणी आर्मी काय असते हे शिकवले गेले त्यानंतर गोवा येथे प्रत्यक्षात आर्मी चे प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर माझी पहिली पोस्टींग भटींडा येथे झाली डिस्पॅच्ड रायडर म्हणून माझी नियुक्ती झाली ‘ विविध ठिकाणी असणाऱ्या सैन्य दलातील जवानांशी कम्युनिकेशन करणे म्हणजेच एका अर्थी पोस्टमन प्रमाणे काम करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली सन २०१३ पासून ७ वर्षे भटींडा बारामुल्ला मुंबई आणि आता सिलीकुडी येथे आपण सेवा बजावत आहोत वर्षातून ९५ दिवसाची सुट्टी भेटते त्यावेळी शक्यतो गणेशोत्सवाकरीता कुटुंबात येण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने माझी अर्धांगिनी ही मिलिट्री अफ सिंगे या गावातील सैनिक परंपरा असलेल्या कुटुंबातील आहे, असे राजन राऊत यानी सांगितले.