पूर ओसरताच महाड नगरपालिकेकडून शहर स्वछता मोहीम सुरू

महाड: गेले चार दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरामध्ये दोन दिवस पुराचे पाणी शिरल्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाल आहे. पूर ओसरु लागताच भिजलेले सामान बाहेर फेकल्याने दुर्गंधी आणि आरोग्याला धोका होवू नये म्हणून गुरुवारी महाड नगरपालिकेतर्फे तात्काळ शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्यामुळे समस्त शहरवासियांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.

 सध्या शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सावित्री नदीच्या पुराचे पाणी वारंवार शहरांत शिरुन शहरवासियांचे विशेषत: व्यापाऱ्यांचे प्रतिवर्षी प्रचंड नुकसान होते. या अनुषगांने पालिकेच्या वतीने नागरिकांसाठी सर्व तऱ्हेची काळजी घेण्यात येते.  नदी पात्राच्या पाण्याच्या पातळीबाबत सावधानतेचा वारंवार इशारा, जलतरण पट्टूंचा संच, स्पीड बोटी, फायर फायटर, रुग्णवाहिकेसह जय्यत तयारी ठेवण्यात येते.

पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी जीवन पाटील सगळ्या यंत्रणावर लक्ष ठेवून त्या हाताळत आहे. शहराला पूर, महापूर नवीन नाही. मात्र यानंतर येणारी महामारी जीवघेणी असते. यामुळेच दोन दिवसांचा शहरांतील पूर ओसरताच पालिका प्रशासनानी वेगाने शहर स्वछता मोहीम राबवून तात्काळ यश मिळविले आहे. त्यामुळे जीवन पाटील आणि सर्व कर्मचारी, कामगार वर्गाचे कौतुक करावे तेवढ कमीच आहे.