electricity

कल्याण :  मोहिली बल्याणी दरम्यान रानमाळात चाऱ्यासाठी गेलेल्या बकऱ्या विजेचा शॉक लागुन मृत्युमुखी पडल्याची घटना आज सकाळ घडली. त्यामुळे आदिवासी महिलेने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

टिटवाळ्याजवळील मोहीली ते बल्याणीमध्ये रानमाळात या बकऱ्या सकाळच्या सुमारास येथील रहिवाशी अनिता बबन मोनो या आदिवासी महिलेने सोडल्या होत्या. मात्र या रानमाळातून राज्य विद्युत पारेषण विभागाच्या विद्युत पोल वरील चालू लाईन तुटून पडली गेली होती, याच दरम्यान या ४ बकरी, बकरे खाली पडलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागुन चिकटून मृत झाले असल्याचे आदिवासी महिला अनिता मोनो यांनी सांगितले आहे.

याबाबत अनिता मोनो यांनी टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये श्रमजीवी संघटनेचे येथील कार्यकर्ते गणेश भामरे यांच्यासमवेत जाऊन राज्य विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बकरी आणि बकरे मृत्यमुखी पडल्याचा आरोप करून भरपाईची मागणी केली आहे. याबाबत टिटवाळा पोलिसांनी दखल घेत मृत्यूमुखी पडलेल्या चार बकऱ्यांचे पंचनामे केले आहेत. दरम्यान टिटवाळा विद्युत मंडळाचे उप अभियंता धूर्वे यांना याबाबत विचारले असता नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले.