नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट

महाड : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या रक्षाबंधन या सणासाठी बाजारपेठ फुलली आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट येताना दिसत आहे.

हिंदूंच्या अनेक सण उत्सवांमधील बहीण भावाच्या अतूट नात्याला भक्कम बांधून ठेवणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन . शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या सणावर  कोविड -१९ मुळे प्रथमच ब्रेक लागताना दिसत आहे. स्वाभाविकच भाऊ-बहीण यांच्यासह व्यापारी यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे यंदा राखी स्टॉल कमी उभारण्यात आले आहेत.

कोरोनाने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. यामध्ये  सण-समारंभ यांचाही समावेश आहे. सगळेच उत्सव शक्य तेवढ्या साध्या पद्धतीने साजरे करावे असे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र राख्या खरेदीसाठी सध्या कोरोनाचा धोका पत्करून बहिणी बाजारात फिरत आहेत. ही राखी कोरोनाच्या महारोगापासून आपल्या भावाचे रक्षण करेल,अशी भावना महिलांमध्ये दिसून येत आहे.

 एकीकडे बंधुप्रेम आणि दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा द्विधा स्थितीत राखी खरेदीसाठी बाजारात फिरताना महिला दिसत आहेत. ही बाब धोकादायक जरी असली तरी तोंडावर मास्क घालून, सॅनिटायझर लावून आणि सोशल डिस्टन्स पाळून खरेदी करण्यास काही हरकत नसली तरी यंदा हा सण साधेपणाने साजरा करावा, असे मत काही नागरिक व्यक्त करीत आहेत.

फ्रेंडशीप डे लाही फटका

तरुणांचा आवडता दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा जागतिक मैत्री दिवस. मित्र-मैत्रिणी गिफ्ट खरेदी करणे, फ्रेंडशिप बँड बांधणे, हॉटेल कॅफे मध्ये पार्टी करणे अशा प्रकारे या दिवशी तरुणाई फ्रेंडशिप डे साजरा करते परंतु यावर्षी कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने फ्रेंडशिप डे सोशल मीडियाद्वारे साजरा करावा लागणार असे चित्र दिसत आहे.