रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीमध्ये होणार गुन्हे दाखल

कल्याण : कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने खंबीर भूमिका घेतली आहे. कोरोना चाचण्या वाढीकडे लक्ष केंद्रीत  केले आहे. कोरोना चाचण्या वाढल्या की,  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर वेळीच उपचार करून मुत्यु दराला आळा बसु शकतो. तसेच पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या कोरोना संशियतामुळे कॉन्टॅक्ट ट्रसिंग वाढवून चेन तोडण्यास मदत होऊन रूग्णसंख्या कमी होण्यास आळा बसू शकतो. अशातच कल्याण डोंबिवलीमधील खाजगी ओ पी डी चालविणारे डॉक्टर कोरोना टेस्टबाबत हलगर्जीपणा करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी खंबीर भूमिका घेत कारवाईचा बडगा उचलला आहे.

फॅमिली डॉक्टर कोव्हीड फायटर संकल्पनेनुसार अनेक खाजगी डॉक्टर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला कोरोना साथरोगाला आळा घालण्यासाठी सहकार्य करत आहेत. मात्र काही खाजगी डॉक्टर ताप सर्दी खोकल्याच्या  रुग्णाच्या इतर सर्व तपासण्या करताना कोरोना टेस्ट मात्र करत नाहीत. यामुळे अनेकदा रुग्ण कोरोनामुळे अत्यवस्थ होऊन मग कोरोना रुग्णालयात दाखल होतो. अशा रुग्णाला तातडीने आयसीयूची गरज लागते. असे रुग्ण दगावण्याची शक्यतादेखील अधिक असल्यामुळे शहरातील मृत्यू दर वाढण्याची भीती असल्याने रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या खाजगी डॉक्टरवर साथ रोग कायद्यानव्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी  दिले आहेत.

पालिका प्रशासनाने १७ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केली असून या केंद्रावर रुग्णांची मोफत अँटिजेंन टेस्ट केली जाते. यामुळे कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाबरोबरच सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांना या केंद्रावर तपासणीसाठी संदर्भीत करावे, असे आवाहन पालिकेच्या साथरोग अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.