कोरोनाच्या नव्या प्रकाराचा दिल्लीतही शिरकाव, ४ रुग्ण सापडल्याचे झाले स्पष्ट

आतापर्यंत १६ देशांमध्ये या नव्या कोरोनाचा(corona new strain) शिरकाव झाला आहे. भारतातही नवा कोरोना हातपाय पसरू लागला आहे. दिल्लीतही नव्या प्रकारच्या कोरोनाचे ४ रुग्ण आढळल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे (corona new strain) पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत १६ देशांमध्ये या नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतातही नवा कोरोना हातपाय पसरू लागला आहे. दिल्लीतही नव्या प्रकारच्या कोरोनाचे ४ रुग्ण आढळल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले आहे की,“दिल्लीतील कोरोनाबाधित रूग्णांपैकी चार रूग्णांच्या अहवालात व्हायरसच्या नव्या प्रकाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत”.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले. यात ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होते. यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन  आढळून आला. हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला. त्यामुळे एकूण सहा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याची माहिती होती. आता यात दिल्लीतील चार रूग्णांची भर पडली आहे.