पीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी

पीएम नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच हायस्पीड इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या जाऊ शकतात, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी २४ जूनला जम्मू काश्मीरबाबत बैठक होणार आहे. यात बैठकीला जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. तत्पूर्वी मोदी आणि जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीपूर्वी एलओसीवर ४८ तासांचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच हायस्पीड इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या जाऊ शकतात, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मेहबुबा मुफ्ती यांचं दिल्लीत आगमन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरहून दिल्लीत पोहचल्या आहेत. २४ जून रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत त्या सहभागी होतील. तसेच या बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू काश्मीर भाजपा अध्यक्ष रविंदर रैना आणि पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ताही जम्मूहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २४ जून रोजी जम्मू-काश्मीरसंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात जम्मू काश्मीरच्या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी मंगळवारी श्रीनगरमध्ये गुपकार संघटनेची बैठक झाली. ही बैठक माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांच्या निवासस्थानी झाली.