आनंद गिरी, आध्या तिवारी यांना CBI ने घेतलं ताब्यात, CBI ने केली 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी

    नवी दिल्ली : प्रयागराजमधील बाघंबरी मठाचे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वेगात सुरु आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करतअसून, सीबीआयने आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीप तिवारी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केलं व तीघांच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे.

    या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. ही याचिका सीबीआय टीमचे तपास अधिकारी अतिरिक्त एसपी के एस नेगी यांच्या वतीने करण्यात आली असून, न्यायालयाने पोलिस कोठडीची परवानगी दिल्यास आनंद गिरीची चौकशी करण्यासाठी सीबीआय नैनी जेलमध्येही जाऊ शकते. सध्या हे तिघे 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, जर न्यायालयाने तिघांच्याही रिमांडला मान्यता दिली, तर सीबीआय तिघांची एकत्र चौकशी करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

    या प्रकरणात सीबीआयला सर्व आरोपींची चौकशी करायची आहे. यासोबतच तपास यंत्रणेला सर्व आरोपींचे जबाब नोंदवायचे आहेत. सीबीआयला आरोपींसोबत गुन्हेगारीचे ठिकाण पुन्हा तयार करायचे आहे. आता कोर्टाने यासाठी परवानगी देणार की नाही हे पाहावे लागेल. आज प्रयागराजला पोहोचल्यावर सीबीआयने बाघंब्री मठात गुन्ह्याचे ठिकाण पुन्हा तयार केले.

    दरम्यान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने शुक्रवारी एफआयआर नोंदवला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

    घटनास्थळी सापडलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी, बडे हनुमान मंदिराचे पुजारी आद्यप्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना महंत नरेंद्र गिरी यांच्या या आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले होते. कोर्टाने कथित सुसाईड नोटमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.