काँग्रेस करतेय शेतकऱ्यांची दिशाभूल, भाजपाध्यक्षांनी शेअर केला सोनिया गांधींचा व्हिडिओ

नड्डांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये सोनिया गांधी एका सभेत बोलताना दिसतात. यात सोनिया गांधी विचारतात की, शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून सोडवून मालाला चांगली किंमत मिळवून द्यायला हवी की नको? हा व्हीडिओ ट्विट करून नड्डा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

दिल्ली :  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत. यातच काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. काँग्रेस सातत्याने भाजपवर टीका करत असून आता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे. काँग्रेस शेतकऱ्यांची कशी दिशाभूल करत आहे, असा आरोप जेपी नड्डा यांनी ट्विटच्या माद्यमातून केला आहे.

नड्डांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये सोनिया गांधी एका सभेत बोलताना दिसतात. यात सोनिया गांधी विचारतात की, शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून सोडवून मालाला चांगली किंमत मिळवून द्यायला हवी की नको? हा व्हीडिओ ट्विट करून नड्डा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर काँग्रेसचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसचे सत्य समोर आले आहे.

सोनिया गांधी यापूर्वी शेतकऱ्यांना दलालमुक्त बाजाराची वकिली करत होत्या. मात्र आता विरोध करत आहेत. ही आहे काँग्रेसची संधीसाधू विचारसरणी, कमी माहिती आणि पुन्हा पुन्हा आपल्या वक्तव्याविरोधात वागत असल्याचे यातून दिसते, अशी टीकाही नड्डा यांनी केली आहे.