खोटी कागदपत्रं सादर करून त्याने २५ पेक्षा जास्त बँकांना घातला गंडा, केला तब्बल ४००० कोटींचा फ्रॉड

आरोपी विजय शर्मा(Vijay Sharma) याच्या मालकीचा एक पेट्रोल पंप आहे, एक तंत्रज्ञान क्षेत्रातला उद्योग आणि ॲल्युमिनियम स्क्रॅप युनिटचाही तो मालक आहे. हिमाचल प्रदेशात त्याचा खासगी बसेसचाही व्यवसाय आहे.

  दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे(Crime) विभागाने २५ पेक्षा जास्त बँकांना ४,००० कोटी रुपयांचा गंडा(Fraud) घालणाऱ्या एका कंपनीच्या संचालकाला अटक(Arrest) केली आहे. आरोपीवर या व्यतिरिक्त फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल असूून २ गुन्ह्यांचा तपास सीबीआय करत आहे.

  आरोपी विजय शर्मा याच्या मालकीचा एक पेट्रोल पंप आहे, एक तंत्रज्ञान क्षेत्रातला उद्योग आणि ॲल्युमिनियम स्क्रॅप युनिटचाही तो मालक आहे. हिमाचल प्रदेशात त्याचा खासगी बसेसचाही व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याव्यतिरिक्त ५ गुन्हे त्याच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत. हे पाचही गुन्हे फसवणुकीचेच आहेत. त्यापैकी २ गुन्ह्यांचा तपास अनेक वर्षांपासून सुरु असून सीबीआय हा तपास करत आहे.
  पोलिसांनी सांगितलं की, दिल्लीतल्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने २०१६ मध्ये शर्मा आणि अजून एका व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. दोघेही ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या व्यवसायात आहेत. त्यांनी ३० कोटींचं क्रेडिट घेतलं. मात्र कधीही परतावा भरला नाही. काही दिवसांनंतर कळालं की यांनी बँकेची फसवणूक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  तपासादरम्यान पोलिसांना हे आढळून आलं की, आरोपीने खोटी बिलं आणि क्रेडिटसाठीची खोटी पत्रं दाखवून अनेक बँकांना फसवलं आहे. त्याने अनेक बँकांकडून कर्ज घेतली, मात्र ती कधीच परत केली नाहीत. त्याचा व्यवसाय आणि त्याच्या बिलांच्या आधारे बँकांनी त्याला कर्ज दिलं.

  २०१६मध्ये या दोघांवर १५ बँकांना १,५२८ कोटींना फसवलं असल्याचा आरोप आहे. तर दुसऱ्या प्रकरणात या दोघांनी ९ बँकांची ५५५ कोटींची फसवणूक केली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे. पोलिसांनी हेही सांगितलं की, हे दोन्ही आरोपी उत्पादन शुल्काच्या संबंधी २००० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात सहभागी आहेत. या प्रकरणाचा तपास हिमाचल प्रदेशातल्या सीआयडीकडे आहे.

  पोलिसांनी शर्माच्या घरावर छापा टाकत त्याला हिमाचल प्रदेशातून अटक केली. आपल्या दोन कंपन्यांची बिलं दाखवून शर्मा बँकांकडून कर्ज घ्यायचा. मात्र, या दोन्ही कंपन्या अस्तित्वातच नसल्याचं पोलिसांना तपासादरम्यान समजलं आहे.