दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के, नाताळच्या पहाटेच हादरली राजधानी

दिल्लीतील नागग्लोई भागात पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची नोंद २.३ रिश्टर स्केल इतकी झालीय. पहाटे ५ वाजून २ मिनिटांनी हा भूकंप झाला. गेल्या दहा दिवसांत दिल्ली दुसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलीय. यापूर्वी १७ डिसेंबर या दिवशी राजस्थानमधील अलवर भागात भूकंप झाला होता. सलग छोटे छोटे भूकंप येणं, ही मोठ्या भूकंपाची नांदी असते, असंही शास्त्रज्ञ सांगतायत

राजधानी दिल्लीत आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटेच्या सुमाराला दिल्लीतील अनेक परिसरात हे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. कडाक्याच्या थंडीत हे भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे दिल्लीकर भयभीत झालेत.

दिल्लीतील नागग्लोई भागात पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची नोंद २.३ रिश्टर स्केल इतकी झालीय. पहाटे ५ वाजून २ मिनिटांनी हा भूकंप झाला. गेल्या दहा दिवसांत दिल्ली दुसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलीय.

यापूर्वी १७ डिसेंबर या दिवशी राजस्थानमधील अलवर भागात भूकंप झाला होता. याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. याचे धक्के दिल्ली-एनसीआर परिसरातही जाणवले होते. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला दिल्लीतही भूकंप झाला होता, ज्याचं केंद्र गाझियाबाद होतं. २ डिसेंबर रोजी झालेल्या या भूकंपाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल इतकी होती.

देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दिल्लीत एकूण १० वेळा भूकंप झालेत. यातील सर्व भूकंपाचा केंद्रबिंदू हा एनसीआरच्या आसपासच असल्याचं स्पष्ट झालंय. काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञांनी हिमालयात भूकंप येईल, अशी शक्यता वर्तवली होती. भूकंपाची मालिका सुरू होऊन एक मोठा भूकंपही होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं. त्या भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केलपेक्षाही अधिक असेल, असं सांगितलं जातं. मात्र असा भूकंप नेमका कधी होईल, याचा निश्चित कालावधी सांगणं शक्य नसल्याचंही शास्त्रज्ञ सांगतात.

मात्र गेल्या सहा महिन्यात उत्तर भारतातील वेगवेगळ्या परिसरात होत असलेले भूकंप हे शास्त्रज्ञांच्या म्हणण्याला एक प्रकारे दुजोराच देत असल्याची चर्चा आहे. सलग छोटे छोटे भूकंप येणं, ही मोठ्या भूकंपाची नांदी असते, असंही शास्त्रज्ञ सांगतायत.