शेतकरी पुन्हा आक्रमक; केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात 27 सप्टेंबरला ‘भारत बंद’

केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिली आहे. 27 सप्टेंबरला शेतकरी देशातील विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात निषेध नोंदवतील. संसदेतून हे तिन्ही कायदे पास होऊन वर्षभराहून अधिकचा कालावधी लोटला आहे. तब्बल वर्षभरापासून शेतकरी या कायद्यांविरोधात दिल्लीला लागून सीमेवर धरणे देऊन बसले आहेत.

    दिल्ली : केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिली आहे. 27 सप्टेंबरला शेतकरी देशातील विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात निषेध नोंदवतील. संसदेतून हे तिन्ही कायदे पास होऊन वर्षभराहून अधिकचा कालावधी लोटला आहे. तब्बल वर्षभरापासून शेतकरी या कायद्यांविरोधात दिल्लीला लागून सीमेवर धरणे देऊन बसले आहेत.

    तसेच देशाच्या अन्य भागातही शेतकरी कायद्यांचा निषेध करत आले आहेत. संयुक्त किसान मोर्चाशिवाय अनेक संघटनांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. भारत बंद पूर्णपणे शांततेत पाळला जाईल, असेही शेतकरी संघटनांनी सांगितले आहे. 27 सप्टेंबरला सकाळी 6 वाजतापासून भारत बंदला सुरुवात होईल आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाळला जाईल.

    केंद्र आणि राज्य सरकारची सर्व कार्यालये आणि संस्था बंद, बाजारपेठा, दुकाने आणि उद्योग बंद राहणार. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था बंद राहतील. सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी वाहने बंद राहणार.

    रुग्णालये, वैद्यकीय दुकाने, रुग्णवाहिका आणि कोणत्याही वैद्यकीय सेवांना सूट देण्यात आले. कोणत्याही प्रकारची सार्वजनिक (अग्निशमन दल, आपत्ती निवारण इ.) किंवा वैयक्तिक आणीबाणी (मृत्यू, आजारपण, लग्न इ.) यांना सवलत देण्यात आली.

    संयुक्त किसान मोर्चाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मोर्चाने म्हटले आहे की, बंद दरम्यान लोकांना स्वेच्छेने सर्वकाही बंद करण्याचे आवाहन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नका. या आंदोलनात हिंसा किंवा तोडफोड होऊ नये. हा बंद सरकारच्या विरोधात आहे, लोकांच्या विरोधात नाही, असेही मोर्चाने म्हटले आहे.