गाझीयापूर सीमेवर शेतकऱ्यांनी नाचगाण्यांसह साजरी केली होळी, सरकारला केलं हे आवाहन

केंद्रीय कृषी कायदे रद्द करावेत आणि किमान हमीभावाबाबत ठोस कायदा बनवावा, या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर सध्या आंदोलन करत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशच्या सीमेवर म्हणजेच गाझीयापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी होळी साजरी करत एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नाचून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन त्यांनी होळी सण साजरा केला. 

    केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच होळी साजरी केली आणि देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

    केंद्रीय कृषी कायदे रद्द करावेत आणि किमान हमीभावाबाबत ठोस कायदा बनवावा, या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर सध्या आंदोलन करत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशच्या सीमेवर म्हणजेच गाझीयापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी होळी साजरी करत एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नाचून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन त्यांनी होळी सण साजरा केला.

    केंद्र सरकारनं लवकरात लवकर तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि आम्हाला घरी जाण्यासाठी मोकळं करावं, असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं. केंद्र सरकारच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे शेतकरी सीमेवर ठाण मांडून असल्याचं ते म्हणाले. जोपर्यंत तिन्ही कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलाय.

    दरम्यान, रंग किंवा गुलाल न वापरता मातीचा टिळा लावून होळी साजरी करण्याचा निर्णय़ही काही शेतकऱ्यांनी घेतला आहे. साध्या पद्धतीनं होळी साजरी करून आंदोलन पुढं सुुरू ठेवण्यात आलंय. आंदोलनाचा आज (सोमवार) १२३ वा दिवस आहे. केंद्र सरकारनं कायदे माघारी घेतले नाहीत, तर दिवाळीदेखील इथंच साजही करण्याची तयारी आम्ही केलेली आहे, असं शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय.

    गेल्या काही आठवड्यांपासून सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा थांबली असून सरकारच्या गर्विष्ठ धोरणामुळे चर्चा रखडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तर हा कायदा दीड वर्ष स्थगित करण्याची आणि अगोदर मान्य केलेले बदल करण्यासाठी आम्ही अजूनही तयार आहोत, असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र कायदा स्थगित नको, तर रद्दच केले पाहिजेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.