सरकार आहे की अ‍ॅमेझॉन?; काँग्रेसचा सवाल

केंद्र सरकारने शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामधील संपूर्ण हिस्सेदारी विक्रीसंदर्भात निविदा मागवल्या आहेत. बीपीसीएलनंतर आणखीन एक सरकारी कंपनी केंद्र सरकारने विक्रीसाठी काढली असून या कंपनीमधील आपली संपूर्ण हिस्सेदारी म्हणजेच ६३.७५ टक्के हिस्सा विकणार आहे.

  • congress, randeep surjewala

दिल्ली.  देशामध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासगीकरणाच्या धोरणावरुन काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारने शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामधील संपूर्ण हिस्सेदारी विक्रीसाठी काढल्याच्या बातमीचे छायाचित्र  ट्विटरवरुन शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली. देशातील सर्व गोष्टी विकून टाकण्याचे मोदी सरकारचे धोरण असल्याचा टोला सुरजेवाला यांनी लगावला. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणारुन केंद्रावर निशाणा साधताना हे सरकार आहे की अ‍ॅमेझॉन, असा खोचक प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारला आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची होणार विक्री
केंद्र सरकारने शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामधील संपूर्ण हिस्सेदारी विक्रीसंदर्भात निविदा मागवल्या आहेत. बीपीसीएलनंतर आणखीन एक सरकारी कंपनी केंद्र सरकारने विक्रीसाठी काढली असून या कंपनीमधील आपली संपूर्ण हिस्सेदारी म्हणजेच ६३.७५ टक्के हिस्सा विकणार आहे. या खरेदीसाठी इच्छूक असणाऱ्या कंपन्यांनी १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करण्यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याच बातमीचे कात्रण शेअर करत सुरजेवाला यांनी, देश नाही विकू देणारऐवजी आता देशातील एकही संपत्ती शिल्लक नाही ठेवणार, सगळं काही विकून टाकणार अशी नवी घोषणा आहे, असा टोमणा हाणला. तसेच हे देशातील सरकार आहे की ओला-अ‍ॅमेझॉन? असा सवालही केला.