Major reshuffle in Congress For the first time three members of the Gandhi family were involved
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; पहिल्यांदाच गांधी कुटुंबातल्या तीन सदस्यांचा समावेश

  • मुकुल वासनिक, राजीव सातव आणि रजनी पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये (congress) मोठे फेरबदल (changes) करण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची फेररचना करण्यात आली आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, आंबिका सोनी, आनंद शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारिणीत यावेळी पहिल्यांदाच गांधी कुटुंबातल्या (gandhi family) तीन सदस्यांचा समावेश आहे. सोनिया गांधी (sonia gandhi), राहुल गांधी (rahul gandhi) आणि प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांचा समावेश आहे.

तर माजी राज्यसभा सदस्य आणि हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनी पाटील यांच्याकडे जम्मू काश्मीर प्रभारीपद देण्यात आले आहे, तर हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांच्याकडे गुजरात, दादरा, नगर, हवेली, दीव दमणचे प्रभारीपद देण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आले आहे. रजनी पाटील आणि सातव यांचा समावेश कायम निमंत्रितांमध्ये करण्यात आला आहे. तर वासनिक हे सीडब्ल्यूसीचे सदस्य असतील. तर कर्नाटकचे माजी मंत्री आणि गदगचे आमदार एच के पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्राचे (maharashtra) प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे. राज्यातील बडे नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना मात्र या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले बिहारचे नेते तारिक अन्वर यांना महासचिव पद देण्यात आलं असून सोनिया गांधी यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. अन्वर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराज होऊन पक्ष सोडला होता. अन्वर यांना केरळची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर सोनिया गांधींना पत्र लिहून वादळ निर्माण करणारे गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटवण्यात आलं आहे. ते काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य आणि राज्यसभेत पक्षाचे नेते असतील.

रणदीप सिंह सुरजेवाला यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. त्यांना कर्नाटकचं प्रभारी बनविण्यात आलं आहे. त्याचबरोबर कार्यकारीणतही स्थान देण्यात आलं आहे. त्याच बरोबर कांग्रेस अध्यक्षांना मदत करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्यातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पत्र लिहिणारे जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगालचे प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. या पत्रांवर स्वाक्षरी असलेले आनंद शर्मा आणि मनीष तिवारी यांना कुठलंही पद देण्यात आलेलं नाही. लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना पश्चिम बंगालचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे.