टिकरी सीमेवर शेतकऱ्याची हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

झज्जर बस स्थानकाजवळ ६१ वर्षीय शेतकऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असून त्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. ठिक-ठिकाणी भारत बंदला प्रतिसाद मिळत असतानाच टिकरी सीमेवर एक धक्कादायकबाब समोर आली आहे. टिकरीजवळ असलेल्या झज्जर बस स्थानकाजवळ एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. गळा चिरून ६१ वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    हत्या झालेल्या शेतकऱ्याची ओळख पटली असून हकम सिंग असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते भटिंडा येथील रहिवासी आहेत. बहादूरगड पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवालाची नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्याचे कुणाशी भांडण झाले होते का किंवा वैर होते का, तसेच या हत्येमागे काय कारण असू शकते, याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    दरम्यान, गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त काळ शेतकरी वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन असून हे कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मात्र कायद्यात दुरुस्ती केली जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे. चर्चेची द्वारे यावर तोडगा काढला जाऊ शकतो ही केंद्राची भूमिका आहे . त्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी चर्चेला यावे असेही आवाहनही सरकारने केले आहे.