उत्तराखंडजवळ चीनच्या १०० सैनिकांनी सीमारेषा ओलांडली, पूल तोडून पळाले, महिभरानंतर वास्तव समोर

पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी भारत आणि चिनी सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यात अनेकांचे प्राणही गेले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून माघार घेण्यात आली होती. आता चीनने पुन्हा घुसखोरी करत डोके वर काढले आहे.

    नवी दिल्ली: सीमावादात चीन आपल्या घुसखोरीची कृत्ये थांबवायला तयार नसल्याचं दिसतंय. एका बाजूला सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी भारतासोबत चर्चा करत असलेला चीन, दुसरीकडे मात्र घुसखोरीला पाठिंबा देत असल्याचं समोर आलं आहे. नवीन घटना ही उत्तराखंडच्या बाराहोती सेक्टरला लागून असलेल्या सीमेवरील आहे. गेल्या महिन्यात या ठिकाणी चीनच्या १०० सैनिकांनी लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोल म्हणजेच एलएसी पार केल्याची माहिती आता समोर आली आहे.  पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी सैनिकांनी ३० ऑगस्ट रोजी ही घुसखोरी केली होती, त्यानंतर ते या ठिकाणी ३ तास होते, त्यानंतर ते परतले. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांकडून या परिसरात गस्त घालण्यात आली आणि बंदोबस्तता वाढ करण्यात आली. अधिकृतरित्या या घुखोरीबाबत कुणीही माहिती देण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०० चिनी सैनिक घोड्यांवरुन घुसखोरी करत भारताच्या प्रदेशात दाखल झाले, त्यांनी सीमावर्ती परिसरात तोडफोड केली आणि परत जाण्यापूर्वी एक पूलही तोडल्याची माहिती आहे. बाराहोतीच्या याच परिसरात १९६२ साली झालेल्या युद्धापूर्वी चिनी सैनिकांनी पहिल्यांदा घुसखोरी केली होती.

    उत्तराखंडच्या या बाराहोती सेक्टमध्ये असलेल्या सीमा रेषेवर घुसखोरीच्या लहान मोठ्या घटना नेहमीच घडत असतात. यावरुन दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये तणावही असतो. यावेळी मात्र घुसखोर चिनी सैनिकांची आकडेवारी धक्कादाय़क मानली जात आहे. या सीमारेषेच्या जवळ चीनकडून सुरु असलेल्या बांधकामातही गती आली आहे.
    चीनने लडाखमध्ये एलएसीजवळ आठ ठिकाणी तात्पुरते टेंन्ट उभारल्याची माहितीही गेल्याच आठवड्यात समोर आली होती. पिपल्स लिबरेशन आर्मीने उत्तरेकडे वहाब जिल्गापासून पीयू, हॉट स्प्रिंग, चांगला, ताशिगॉन्ग, मान्जा आणि चुरुपपर्यंत राहण्यासाठी निवारे अभारल्याची माहिती आहे.

    पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी भारत आणि चिनी सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यात अनेकांचे प्राणही गेले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून माघार घेण्यात आली होती. आता चीनने पुन्हा घुसखोरी करत डोके वर काढले आहे.