आंध्रात हिंदुत्वाची नवी लॅब!; तिरुपती पोटनिवडणुकीत ख्रिश्चन विरुद्ध कृष्ण मुद्दा

आंध्र प्रदेश भाजपाच्या हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा होत असल्याचे दिसू लागले आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात भाजपा सातत्याने हल्लाबोल करीत आहे.

दिल्ली. आंध्र प्रदेश भाजपाच्या हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा होत असल्याचे दिसू लागले आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात भाजपा सातत्याने हल्लाबोल करीत आहे. ख्रिश्चन धर्माला प्रोत्साहन आणि हिंदुंचे प्राचीन अवशेष नष्ट करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी सुरू केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी तिरुपती लोकसभा मतदारसंघात होत असलेली आगामी निवडणूक ख्रिश्चन विरुद्ध कृष्ण अशी होणार असल्याची माहिती दिली आहे. देवधरांच्या या स्पष्टोक्तीनंतरच आंध्रात हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा तर उभारली जात नाही ना या शंकेला वाव मिळाला आहे.

हिंदू विरोधी घटनांमध्ये वाढ
आंध्र प्रदेशात ४०० वर्ष पुरातन प्रभु रामचंद्रांची मूर्ती खंडित झाल्याचे वृत्त पसरताच भाजपा नेते सुनील देवधर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ज्या पद्धतीने आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर हल्ले होत आहे ते पाहू जाता १६ व्या शतकातील क्रूर सेंट झेव्हियरची आठवण ताजी होते असे ते म्हणाले. सेंट झेव्हियरने गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आणि जबरीने धर्मांतर करविले होते, असा दाखलाही देवधर यांनी दिला. यापूर्वी देवधर यांनी राज्य प्रायोजित धर्मांतराचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळेच नव्या घटनेनंतर देवधर यांनी केलेल्या हल्लाबोलनंतर आंध्र प्रदेशातही हिंदुत्वाची प्रयोगशाळा उभारली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात भ्रष्टाचार, माफियाराज

दरम्यान भाजपा सर्वच मुद्यांवर आक्रमक झाली असल्याचे देवधर म्हणाले. राज्याची आर्थिक दिवाळखोरी, भ्रष्टाचार, माफियाराज या सर्वांवर त्यांनी तोंडसुख घेतले. राज्य सरकारकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, भ्रष्टाचार, माफिया आणि अव्यवस्थेमुळे राज्यातील कंपन्याही अन्यत्र स्थानांतरित होत आहेत, असे देवधर म्हणाले. त्यावरही मुख्यमंत्री जगनमोहन ध्रुवीकरण करण्यासाठी मनमोहक घोषणाही करीत आहेत, असा टोमणाही त्यांनी हाणला. रस्त्यांची तर दैनावस्था असून माफिया तर वनसंपदेची लूट व तस्करीही करीत आहेत. शेषाचलम पर्वत जगातील एकमेव असा पर्वत आहे जेथे रक्तचंदन मुबलक प्रमाणात आहे तेथेही माफियांनी बस्तान बसविले असून खुलेआम तस्करी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे सर्व जर कायदेशीर मुद्दे आहेत तर मंदिरांवर हल्ले होत असताना हा मुद्दाही आम्ही का उचलू नये असे देवधर म्हणाले.

तेदेप, वायएसआरसीपी हिंदूविरोधी
राज्य सरकारच्या खर्चाद्वारे विशिष्ट पूजा पद्धतीला प्रोत्साहन दिले जात असेल तर त्याविरोधात आम्ही आवाज उठवूच असे देवधर यांनी निक्षूण सांगितले. तेदेप आणइ वायएसआरसीपी हे दोन्ही पक्ष हिंदूविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. मंदिर आणि हिंदूंचे प्रतीक चिन्ह नष्ट करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याकडे कटाक्ष करतानाच राज्य सरकार मूकदर्शक झाली असल्याचा त्यांनी आरोप केला. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी जर कोणी हिंदूंना विरोध करीत असले तर त्याविरोधात आम्ही निश्चितच उभे राहू असेही देवधर यांनी ठणकावले.