इंस्टंट लोनचा नाद खुळा; अ‍ॅपवरून कर्ज घेणाऱ्यांना RBIचा इशारा

छोटे व्यावसायिक पटकन मिळणाऱ्या आणि कोणत्याही कटकटीशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू लागले आहेत. अती व्याजदर आणि मागील दरवाज्याने जास्त पैसे उकळले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

दिल्ली. भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना अनधिकृत पद्धतीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे कर्जासाठी केलेला अर्ज यावरून सावध रहाण्यास सांगितले आहे. आरबीआयने बुधवारी एक प्रसिध्दी पत्रक जारी करत सांगितले की, लोक आणि छोटे व्यावसायिक पटकन मिळणाऱ्या आणि कोणत्याही कटकटीशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू लागले आहेत. अती व्याजदर आणि मागील दरवाज्याने जास्त पैसे उकळले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

याशिवाय वसुलीसाठी हे अ‍ॅप जबरदस्ती आणि कठोर उपाय करू लागले आहेत. हे स्वीकारार्ह नाही. तसेच हे अ‍ॅप कर्जदारांच्या मोबाईल नंबरचा दुरुपयोग करू लागले आहेत. लोकांना हा सल्ला आहे की त्यांनी अशा कोणत्याही भ्रामक प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच जर कर्ज घेत असतील तर त्या अ‍ॅपची आधी चांगल्या प्रकारे चौकशी करावी.

याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्डसह तुमची माहिती, केवायसी कोणत्याही अज्ञात लोकांसोबत किंवा अनधिकृत अ‍ॅपवर देऊ नये. त्यांनी अशाप्रकारच्या अ‍ॅपबाबत संबंधित बँक किंवा कायदेशीर प्राधिकरणाला याची माहिती द्यावी. कायदेशीररित्या कर्ज देण्याचे काम बँक किंवा एनबीएफसी करू शकतात, ज्या आरबीआयकडे रजिस्टर असतील. तसेच त्या राज्य सरकारांद्वारे नियमित केल्या असतील.