
कोवळ्या बांबूची भाजी किंवा भजी आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेत. तथापि, बांबूचा फारसा उपयोग खाण्यासाठी होत नसतो. मुख्यतः बांधकाम क्षेत्र, फर्निचर, शोभेच्या वस्तू, सुतारकाम इत्यादी ठिकाणी बांबू वापरला जातो. मात्र, आता बांबूपासून अशा पाककृती निर्माण झाल्या आहेत, की ज्यामुळे तो सर्वसामान्यांच्या ताटात मानाचे स्थान पटकावून बसेल, अशी स्थिती आहे. बांबूचे लोणचे बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. तथापि, आता नुडल्स, कँडी, पापड इतकेच नव्हे तर भाकरी आणि पोळीदेखील बांबूपासून बनविली जाऊ लागली आहे.
दिल्ली : कोवळ्या बांबूची भाजी किंवा भजी आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेत. तथापि, बांबूचा फारसा उपयोग खाण्यासाठी होत नसतो. मुख्यतः बांधकाम क्षेत्र, फर्निचर, शोभेच्या वस्तू, सुतारकाम इत्यादी ठिकाणी बांबू वापरला जातो. मात्र, आता बांबूपासून अशा पाककृती निर्माण झाल्या आहेत, की ज्यामुळे तो सर्वसामान्यांच्या ताटात मानाचे स्थान पटकावून बसेल, अशी स्थिती आहे. बांबूचे लोणचे बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. तथापि, आता नुडल्स, कँडी, पापड इतकेच नव्हे तर भाकरी आणि पोळीदेखील बांबूपासून बनविली जाऊ लागली आहे.
हिमालय जैवसंपदा प्रौद्योगिकी संस्था (आयएचबीटी) या पालनपूर येथील संस्थेने अनेक प्रयोग करून बांबूपासून खाण्याचे विविध रुचकर पदार्थ तयार करण्यात यश मिळविले आहे.
कॅल्शियम-तंतूंचे अधिक प्रमाण
चवीबरोबरच या पदार्थांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि तंतूचे प्रमाण अन्य सामान्य खाद्यपदार्थांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बांबूपासून बनविलेले हे पदार्थ प्रकृतीसाठी अधिक उत्तम असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे. विशेषतः बांबू नुडल्स लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे. बांबूपासून गव्हल्यासारखा पदार्थ बनवून त्याची खीरही तयार करता येईल. अशा दृष्टीने प्रयोग सुरू आहे.
वस्त्रनिर्मितीसाठीही प्रयत्न सुरू
खाद्यपदार्थांप्रमाणेच बांबूपासून वस्त्रनिर्मितीसाठी धागा तयार करण्याचे प्रयोगही सुरू आहेत. बांबूपासून कोळसा बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हा कोळसा लवकर जळतो आणि त्यापासून धूर कमी निघतो. त्यामुळे इंधनटंचाईच्या काळात पर्यायी इंधन म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. अशारितीने बांबू हे सर्वस्पर्शी पीक म्हणून विकसित करण्यात येत आहे.