नेपाळमध्ये राजकीय संकट; पंतप्रधान ओली येणार भारतात

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के.पी. शर्मा ओली यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जवळपास ठरला आहे.

दिल्ली. नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संकट निर्माण झाले आहे. यादरम्यान भारत आणि नेपाळमधील संबंध पुन्हा एकदा रुळावर येत असल्याचे चित्र आहे. अशातच, भारत आणि नेपाळमधील संबंधांना मजबूत करण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली भारतात येणार आहेत. नव्या वर्षात पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर येऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के.पी. शर्मा ओली यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जवळपास ठरला आहे. ओली ४ जानेवारी रोजी भारत दौऱ्यावर येतील, असे सांगितले जात आहे. त्यापूर्वी, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी भारतात येतील. यापूर्वी, भारतीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला यांनी गेल्या महिन्यात नेपाळचा दौरा केला होता. या दौऱ्यामुळे नेपाळ आणि भारतातील उच्चस्तरीय चर्चा आणि दौऱ्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भारताने नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी अचानक नेपाळची संसद भंग करणे आणि नव्या निवडणुका घेणे, हा शेजारी देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हटले आहे.