कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल धक्कादायक अंदाज, १०० दिवसांच्या लाटेत वाढतील इतके रुग्ण

मुख्य म्हणजे लॉकडाऊन हा यावरचा मुख्य उपाय नसून वेगाने होणारे लसीकरण हाच यातला मुख्य उपाय ठरू शकतो, असंही या अहवालात म्हणण्यात आलंय. सध्या दिवसभरात ३४ लाख जणांचं लसीकरण होतं. हा वेग वाढवून तो ४० ते ४५ लाखांवर गेला, तर पुढच्या चार महिन्यात ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण पूर्ण होऊ शकेल, असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आलाय. 

    गेल्या वर्षीच्या अखेरील नियंत्रणात येत असलेल्या कोरोना रुग्णवाढीचा दर नव्या वर्षात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीचा दर वाढत चालला असून हीच कोरोनाची दुसरी लाट ठरू शकते, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आलाय.

    १५ फेब्रुवारीपासून या लाटेचा विचार या अहवालात करण्यात आलाय. १५ फेब्रुवारीपासून साधारण १०० दिवस ही दुसरी लाट टिकू शकते. २३ मार्चपर्यंतचे ट्रेंड लक्षात घेतले या १०० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या २५ लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज यात वर्तवण्यात आलाय. सध्याच्या रुग्णवाढीचा दर लक्षात घेता एप्रिल महिन्यात हा आकडा सर्वोच्च स्तरावर पोहोचेल. एप्रिल महिन्याचा मध्य हा दुसऱ्या कोरोना लाटेचा उच्च बिंदू असेल. त्यानंतर ही लाट ओसरायला सुरुवात होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय.

    मुख्य म्हणजे लॉकडाऊन हा यावरचा मुख्य उपाय नसून वेगाने होणारे लसीकरण हाच यातला मुख्य उपाय ठरू शकतो, असंही या अहवालात म्हणण्यात आलंय. सध्या दिवसभरात ३४ लाख जणांचं लसीकरण होतं. हा वेग वाढवून तो ४० ते ४५ लाखांवर गेला, तर पुढच्या चार महिन्यात ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण पूर्ण होऊ शकेल, असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आलाय.

    नागरिकांनी मागच्या अनुभवाचा फायदा करत सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, हात धुणे, सॅनिटायझर वापरणे या उपायांचा अवलंब केला तर ही लाट नियंत्रणात यायला मदत होईल,असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.