पंजाब काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात ४० आमदारांचे पत्र, सोनियांच्या आदेशानंतर आज आमदारांची होणार बैठक

काँग्रेसच्या आजच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या १८ सूत्रीय फॉर्म्युल्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र बंडकोर आमदार आक्रमक असून, कॅप्टन अरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. बंडखोरांकडून प्रभारी हरीश रावत यांच्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळेच केंद्रीय स्तरावर दोन पर्यवेक्षकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    जालंधर- पंजाब काँग्रेसमधील असंतोषाने मोठे स्वरुप धारण केले असून, आता याची झळ मुख्यमंत्र कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या खुर्चीला बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेसच्या ४० आमदारांच्या पत्रानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींना याची दखल घ्यावी लागली आहे. नाराज काँग्रेस आमदारांच्या भावना जामून घेण्यासाठी आज चंदीगडमध्ये काँग्रेस भवनात संध्याकाळी ५ वाजता आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

    काँग्रेसमधील या नाराजीबाबत पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी शुक्रवारी रात्री काँग्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आमदारांच्या बैठकीची माहिती त्यांनी रात्री उशिरा ट्विट केली आहे. आज होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून अजय माकन आणि हरीश चौधरी हे नेते उपस्थित असणार आहेत.

    कॅप्टनविरोधात अविश्वास प्र्स्तावाची तयारी

    काँग्रेसच्या आजच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या १८ सूत्रीय फॉर्म्युल्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र बंडकोर आमदार आक्रमक असून, कॅप्टन अरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. बंडखोरांकडून प्रभारी हरीश रावत यांच्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळेच केंद्रीय स्तरावर दोन पर्यवेक्षकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    दुसरीकडे या बंडखोर आमदारांच्या आव्हाना तोंड देण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या गटातील आमदारांना सिसवा फार्म हाऊसवर बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत बंडखोरांच्या अविश्वास प्रस्तावाबाबत काय पावले टाकायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.