Tensions on the China-Pakistan border; India ready for war

दिल्ली : चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील तणावाची परिस्थिती पाहता भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. 15 दिवसांच्या युद्धानुसार सरकारने तिन्हीही सैन्यदलांना दारूगोळा आणि शस्त्रे गोळा करण्याची परवानगी दिली आहे.

आतापर्यंत सैन्याने दहा दिवसांच्या युद्धाच्या हिशोबाने शस्त्रे गोळा केली आहेत. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) परिस्थिती पाहता हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे सैन्याला आवश्यकतेनुसार स्टॉक व एमरजेंसी फायनेंशियल पावरचा वापर करता येईल. देशाव्यतिरिक्त परदेशातून ५० हजार कोटींची शस्त्रे खरेदी करण्याची योजना आहे.

पाक, चिनला एकत्रितरित्या तोंड देण्याची तयारी

शत्रूंसोबत १५ दिवस युद्ध लढण्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा जमा करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याबरोबर युद्धासाठी सैन्य एकाच वेळी तयार करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी हा साठा वाढवण्यासाठी सैन्याला परवानगी देण्यात आली होती. अनेक वर्षांपूर्वी अशी तयारी करण्यात आली होती की, सैन्याजवळ 40 दिवसांच्या लढाईसाठी युद्धसाठा उपलब्ध राहील. शस्त्रे आणि दारूगोळा साठवणुकीशी संबंधित आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीमुळे ते १० दिवसांवर आणले गेले.

मात्र, उरी हल्ल्यानंतर सैन्याजवळ शस्त्रास्त्राचा फारच कमी राखीव साठा असतो, अशी जाणीव झाली. यामुळे तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सैन्य, नौदल आणि हवाई दलाचे व्हाईस चीफ यांचे खरेदीचे हक्क १०० कोटींवरून ५०० कोटींवर वाढवले ​​होते.

टँक, मिसाईल आणि दारूगोळ्याची व्यवस्था

या तिन्ही सैन्यांना आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची आपत्कालीन फायनेंशियल पावर देण्यात आली होती. तेव्हा हे लक्षात आले की युद्धाच्या स्थितीत याचा वापर केला जाऊ शकतो. सद्यस्थितीत सैन्य शस्त्रे व क्षेपणास्त्र यंत्रणेची खरेदी करत आहे, जेणेकरून परिस्थिती बिघडल्यास दोन्ही मोर्चांवर प्रभावी कारवाई करता येईल. सूत्रांनुसार सैन्याची चिंता कमी करण्यासाठी टँक आणि तोफखान्यासाठी मोठ्या संख्येत मिसाईल आणि दारूगोळ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.