They had forgotten everything; Five years later, the PMO replied

    दिल्ली : एका नागरिकाने पंतप्रधान कार्यालयाकडे मुलीच्या जन्मदाखल्याबाबत पत्रव्यवहाराद्वारे तक्रार केली होती. पण तब्बल पाच वर्षांनंतर त्यांना पीएम ऑफिसकडून मराठीत उत्तर आले. सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने उत्तर पाठवण्यास उशीर झाल्याचे म्हटले आहे. या वेगवान कामाबद्दल ठाणेकर नागरिकाला हसावे की रडावे हे समजेना.

    प्रदीप इंदूलकर असे या नागरिकाचे नाव आहे. आपल्या तक्रारीचे निराकरण झाले नसेल तर पुन्हा आपण तक्रार करावी, असेही पत्रात सूचित करण्यात आले आहे. प्रदीप इंदूलकर यांच्या मुलीचा पासपोर्ट काढायचा होता. जन्मदाखल्यामध्ये त्यांच्या नावाची स्पेलिंग चुकीची असल्याने अडचण निर्माण झाली.

    जन्मदाखल्यामध्ये बदल करून मिळत नव्हता. यासाठी तब्बल त्यांनी दोन महिने संबंधित कार्यालयात फेऱ्या मारल्या. मुलीला पुढील शिक्षणासाठी परदेशात जावे लागत असल्याने त्यातही खोळंबा होत होता. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी यासंदर्भातील तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे लेखीस्वरूपात ईमेलच्या माध्यमातून केली.

    कालांतराने इंदूलकर यांना मुलीचा जन्मदाखलादेखील मिळाला. त्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रार विसरूनदेखील गेले. मात्र, चक्क पाच वर्षांनंतर त्यांनी केलेल्या तक्रारीचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना मिळाले आहे.