आज ठरणार शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची; सुप्रीम कोर्टात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकूण पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकार द्यावेत, अशी शिंदे गटाची मागणी आहे.

    नवी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकीलांची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी बाजू ऐकून घेतली आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी ठाकरेंची की शिंदे गटाची, या प्रश्‍नावर सुनावणी पूर्ण न झाल्याने उर्वरित सुनावणी आज होणार आहे. तुम्ही नवीन पक्ष नाही, तर कोण आहात, असे न्यायाधीशांनी विचारल्यावर आम्ही शिवसेनेतीलच एक गट आहोत, अशी भूमिका शिंदे गटाने (Shinde Group) मांडली. मात्र, शिंदे गटाने पक्ष सोडला असल्याचा दावा ठाकरे गटाने (Thackeray Group) केला आहे.

    सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. शिवसेनेतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी बाजू मांडली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे (Harish Salve), महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) आणि नीरज कौल यांनी; तसेच, राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता (Advocate General Tushar Mehta) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची बाजू मांडली.

    सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकूण पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकार द्यावेत, अशी शिंदे गटाची मागणी आहे.

    शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह यामिनी जाधव, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे यांना अपात्र करण्याची याचिका दाखल केली आहे.