‘वर्क फ्रॉम होम’मुळे कार्यालयीन जागेच्या मागणीत घट

२०१९ मध्ये सरासरी ४.६५ कोटी स्वेअर फूट जागा ही भारतातील दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू या सात प्रमुख शहरांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी भाड्याने घेतली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे यात मोठी घसरण झाली.

दिल्ली. कोरोना महामारीने लोकांच्या जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे सध्या ‘वर्प फ्रॉम होम’ला प्राधान्य दिले जात आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांबरोबरच ऑफिसच्या जागा भाड्याने देणाऱ्यांनाही बसला आहे. देशातील सात महत्त्वाच्या शहरांमधील ऑफिसच्या जागांची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४४ टक्क्यांनी घसरली आहे.

जेएलएल इंडिया या रियल इस्टेट सर्विस देणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार, कार्यालयीन जागांची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.५८२ कोटी स्वेअर फूटने घसरली आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयीन विस्ताराच्या योजना तुर्तास गुंडाळल्या आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले असल्याने ऑफिसच्या जागांची मागणी कमी झाली आहे.

यासंदर्भात जेएलएल इंडियाचे सीईओ रमेश नायर म्हणाले, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ऑफिसच्या जागांसाठीची मागणी ४४ टक्क्यांनी घसरली. मात्र त्याचवेळी २०१६ ते २०१८ दरम्यान ऑफिससाठीच्या जागांच्या मागणीचा विचार केला तर मार्पेटचे चढउतार समजून येतील. कोरोना काळामध्ये सर्वच कंपन्यांनी वर्प फ्रॉम होमचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच ऑफिस कल्चर बदलले. यामुळे कार्यालयीन जागांची मागणी मंदावली, असल्याचे नायर यांनी सांगितले.

२०१९ मध्ये सरासरी ४.६५ कोटी स्वेअर फूट जागा ही भारतातील दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू या सात प्रमुख शहरांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी भाड्याने घेतली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे यात मोठी घसरण झाली. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये ५४.३ लाख स्वेअर फूट जागा या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाडेतत्त्वावर घेतल्या. अनलॉकच्या टप्प्यात जागांची मागणी पुन्हा वाढली. या तिमाहीत ८२.०७ लाख स्वेअर फूट जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली. जानेवारी ते मार्च २०२० दरम्यान कार्यालयीन जागांची मागणी ही ८० लाख स्वेअर फूट इतकी होती. जी पुढील तिमाहीमध्ये ३३.२ लाख स्वेअर फूटांपर्यंत घसरली.