रॅपिड अँटीबॉडी टेस्ट व अँटीजेन टेस्टसाठी शासनाने ठरवले शुल्क

पनवेल: खाजगी प्रयोगशाळा आणि कोविड-१९ साठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता प्रदान केलेल्या उत्पादकांच्या रॅपिड अँटीबॉडी टेस्ट व रॅपिड अँटीजेन टेस्ट वापरणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्यात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत सक्षम अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या तपासण्यांचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारण्यात येणार नाहीत, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  तपासणीचा प्रकार व सर्व करांसहित आकारण्यात येणारे शुल्क :

 ELISA अँटीबॉडी टेस्ट : रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास रु. ४५०/-, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास रु.५००/-, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास रु.६००/- 

CLIA अँटीबॉडी टेस्ट :- रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास रु. ५००/-, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास रु.६००/-, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास रु.७००/- 

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट :- रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास रु. ६००/-, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास रु.७००/-, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास रु.८००/-

शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य सोसायटी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने शिफारस केलेल्या विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या रॅपिड अँटीबॉडी चाचण्यांच्या वापराबाबत शिफारस करणे तसेच शिफारस केलेल्या चाचण्यांच्या अनुषंगाने प्रसिद्ध करावयाच्या अभिव्यक्ती स्वारस्याचा मसुदा तयार करणे, या चाचण्या कशा प्रकारे कराव्यात याची शिफारस करणे इत्यादी बाबी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने आयसीएमआर च्या मान्यताप्राप्त उत्पादकांच्या ELISA,CLIA या रॅपिड अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट व रॅपिड अँटीजेन टेस्ट यांची अचूकता, उपलब्धता, तपासणी साठी लागणारा कालावधी या निकषांवर गुणवत्ता ठरवून त्यांचा कोणकोणत्या स्तरावर कोणत्या तपासणीचा वापर करावा, याबाबतचा तांत्रिक अहवाल शिफारशींसह शासनाला सादर केला. शासनाने हा अहवाल स्वीकृत केला व त्यानुसार चाचण्यांचे कमाल दर निश्चित केले.