होळीनंतर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा पण ‘या’ राज्यांमध्ये मात्र बरसणार जलधारा, जाणून घ्या काय आहे कारण

दोन आठवड्यांपूर्वी राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले होते. हे संकट दूर झाल्यानंतर आता विदर्भासह राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा (heat wave in maharashtra)इशारा देण्यात आला आहे.

  पुणे: होळीनंतर आता राज्यात उन्हाचा चटका(heat wave in maharashtra) वाढू लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले होते. हे संकट दूर झाल्यानंतर आता विदर्भासह राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध जिल्ह्यांचे तापमान चाळीशीपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांचे कमाल तापमान चाळीशीवर गेले आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानाचा पारा आणखी वाढेल.

  काय आहे कारण ?
  सोमवारी ब्रह्मपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्र आणि परिसर व दक्षिण महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती असून बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात पुढील दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते अंदमानाच्या उत्तर भागात सरकेल. हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भाग चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होईल. राज्यातील उन्हाच्या चटक्यात वाढ होऊन उकाडा वाढेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.

  कमाल तापमान चाळीशीपार
  सध्या राज्यातील अनेक भागांत उन्हाचा पारा वाढू लागल्याने कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई येथे कमाल तापमानाचा पारा चाळीशी ओलांडली आहे. इतर भागांत कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत आहे. मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा पारा वाढत आहे. खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने कमाल तापमानही वाढू लागला आहे. या भागात ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. विदर्भात सकाळपासून ऊन वाढत आहे. त्यामुळे तेथील बहुतेक सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदविले गेले.
  बॉक्स

  ‘या’ राज्यांत पावसाची शक्यता
  संपूर्ण देशात कडक उन्हाळा पाहायळा मिळत आहे. उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. असे असले तरी येत्या काही दिवसात काही राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

  दरम्यान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान ४० डिग्रीच्या खाली राहील, असा अंदाज आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेतील तापमान २०.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारी दिल्लीचे तापमान ४०.१ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले, गेल्या ७६ वर्षातील मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान होते.

  भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रादेशिक पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले, मंगळवारी ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने कमाल तपमान सुमारे ३८अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर हवामान खात्याने आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्यानेही २ एप्रिलपर्यंत ईशान्य भारतात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.