परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची राज्य सरकार करणार चौकशी, गृहमंत्र्यांनी केले निर्णयाचे स्वागत, म्हणाले…

अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये(anil deshmukh tweet) असं म्हटलं आहे की, मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(parambeer singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख(anil deshmukh) यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासनाने चौकशीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे.

    अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.सत्यमेव जयते.

    परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांना क्लीन चिट देत चौकशीची किंवा राजीनाम्याचीही गरज नसल्याचं सांगितलं. बुधवारी मात्र  परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

    परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

    दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते.