श्रीवर्धन नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार

कोरोना महामारी व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात दिवस-रात्र वृत्तसंकलन करणाऱ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांना कोरोना योध्दा पुरस्कार देण्याएेवजी श्रीवर्धन महसूल प्रशासन व श्रीवर्धन नगरपरिषद यांनी आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले आहे.

 श्रीवर्धन :  कोरोना महामारी व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात दिवस-रात्र वृत्तसंकलन करणाऱ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांना कोरोना योध्दा पुरस्कार देण्याऐवजी श्रीवर्धन महसूल प्रशासन व श्रीवर्धन नगरपरिषद यांनी आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले आहे. मात्र पत्रकारांना उपेक्षित ठेवले आहे. हवामान खात्याने चक्रीवादळ येणार हा इशारा दिल्यानंतर त्याच्या एक दिवस अगोदर पासून सर्व पत्रकार विविध प्रकारच्या बातम्या किंवा चक्रीवादळ आल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्या हे प्रसिद्ध करत होते. तसेच देशात व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन झाल्यापासून कोरोना साठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावे, घराबाहेर पडू नये याबाबत रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध करण्यामध्ये पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्याशिवाय रोज किती कोरोना रुग्ण सापडले, किती बरे झाले, किती मृत्यू पावले व किती जण उपचार घेत आहेत, याबाबत रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध करण्यामध्ये पत्रकारांचा नित्याने सहभाग होता. 

निसर्ग चक्रीवादळानंतर सामान्य नागरिकांना मदत अतिशय लवकर मिळावी यासाठी सुद्धा पत्रकारांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. तसेच काही नागरिकांना मदत न मिळाल्याबाबत ही पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. लॉकडाऊन नंतर पत्रकारांचे मानधन देखील बंद झालेले आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जपून पत्रकारांनी वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्यदिनी महसूल प्रशासन व श्रीवर्धन नगरपरिषद यांनी केवळ फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित केले व पत्रकारांना उपेक्षित ठेवले. याबाबत श्रीवर्धनमधील पत्रकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.