शेतकऱ्याच्या आंब्यांच्या कलमांची छाटणी करून नुकसान, पोलिसांकडे तक्रार

भिवंडी: शेतीला पूरक म्हणून आंबा(mango) फळबाग लागवड करून आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने माळरानावर ५० आंब्यांच्या कलमांची लागवड करून फळबाग निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या आंबा कलमांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने छाटणी करून फळ बागेचे नुकसान केल्याची घटना शेडगांव येथे घडली आहे.मधुकर शंकर पांढरे असे आंबा फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या शेतकऱ्याने भातशेतीला पूरक व्यवसाय म्हणून कृषी विभागाकडून म.ग्रा.रो.ह.योजनेअंतर्गत आंबा फळबाग या योजनेतून ५० हापूस आंब्यांची कलमे घेऊन त्यांची लागवड माळरानावरच्या एक एकर जमीनीवर केली होती. महिनाभरापूर्वी कलमांची लागवड केल्याने त्यांची निगा व देखभाल शेतकरी मधुकर पांढरे हे करीत होते. दोन ते तीन वर्षातच आंबा फळबाग बहरणार होती. मात्र ही फळबाग अज्ञात शत्रूच्या नजरेत भरल्याने त्याने धारदार शस्त्राने आंब्यांची कलमे कापून ती जमिनीवर आडवी पाडली आहेत. त्यामुळे शेतकरी(farmer) मधुकर पांढरे यांचे मोठे नुकसान(loss) झाले असून आंबा बागायतीचे स्वप्न तुर्तास धुळीला मिळाले आहे.

दरम्यान आंबा कलमांच्या छाटणीचा संशय मधुकर पांढरे यांनी लवलेश भोईर यांच्यावर घेतला असून त्याबाबतची तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पालखणे दुरक्षेत्र पोलीस चौकीत दाखल केली आहे.