ममता भाजपविरोधी रणनीती आखण्यासाठी सज्ज, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसह ‘या’ मोठ्या नेत्यांना लिहिलं पत्र

पश्चिम बंगालच्या(west bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee)यांनी अनेक नेत्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.

    पश्चिम बंगालच्या(west bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee)यांनी अनेक नेत्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रामधून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्याविषयी सांगितलं आहे.

    भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि देशाला नवा पर्याय द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

    ममता बॅनर्जींनी सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्रसमिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवलं असल्याचं समजतं.

    ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रामध्ये अशा ७ गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यावेळी भाजपने लोकशाही आणि राज्यघटनेवर हल्ला केला आहे. भाजपा इतर पक्षांना घटनात्मक हक्क आणि स्वातंत्र्य मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारांचे अधिकार सौम्य करून त्यांना केवळ पालिकेच्या स्तरावर न्यायचं आहे. थोडक्यात त्यांना संपूर्ण देशात एका पक्षाचं हुकूमशाही शासन स्थापन करायचं असल्याचं ममता यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. भाजपला उत्तर देण्याची आता वेळ आली आहे. टीएमसीची प्रमुख म्हणून मी मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इतर पक्षांसोबत या लढ्यात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.