
ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात.
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. तिथून ते बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जातील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर नरेंद्र मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात.
भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे ४० वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचं आयोजन करत आहे. IOC चे ८६ वं अधिवेशन यापूर्वी १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलं होतं. हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचं प्रतीक आहे. या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतर काही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
आयओसी अॅथलीट्स कमिशनचे सदस्य आणि भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाले की, आयओसी सत्र भारतातील तरुणांना ऑलिम्पिक चळवळ अधिक जवळून समजून घेण्यास मदत करू शकतं. ऑलिम्पिक चळवळ खरोखरंच भारतातील तरुणांना चॅम्पियन बनण्यासाठी प्रेरित करू शकते. तरुण समाजाला नवी दिशा देण्यासाठीही सकारात्मक भूमिका बजावू शकतात. मुंबईतील आयओसी अधिवेशनात ऑलिम्पिकशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, ज्यात भविष्यातील ऑलिम्पिक खेळ, खेळांचा समावेश आणि वगळण्याशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.