कल्याण शहरामध्ये सगळी दुकाने उघडायला परवानगी

कल्याण : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील सर्व दुकाने एक दिवसाआड उघडण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शहरातील दुकाने पूर्णतः सुरू करण्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व  महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली होती. आज त्यावर निर्णय झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक अटी आणि शर्थीसह दुकाने सरसकट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत शहरातील दुकाने एकदिवसाआड उघडली जात होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली ५ – ६ महिने व्यापारी आणि बाजारपेठेतील सर्व घटकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. एकदिवसा आड दुकान उघडण्याच्या निर्णयानंतर नेमके कोणते दुकान कोणत्या दिवशी सुरू आहे याची माहिती नसल्याने अजूनही ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. गेले सहा महिने आर्थिक संकट सहन करून अजूनही बाजरपेठा सुरळीत होऊ शकलेल्या नव्हत्या. दुकान कितीही दिवस सुरू राहिले तरी कामगार आणि इतर घटकांना पूर्ण पगार देण्याची आवश्यकता असते. अशा सर्व घटकांचा आणि अडचणींचा विचार करता शहरातील सर्व लॉकडाऊन खुले करून सर्व दुकाने पूर्णतः खुली करण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यावर निर्णय होत कोरोना प्रतिबंधात्मक अटी आणि शर्थीसह दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक काही अटी आणि शर्थींसह सरसकट दुकाने सुरू केल्यामुळे गेली काही महिने आर्थिक संकट ओढावलेले व्यापारी आणि इतर घटकांना त्याचा फायदा होणार आहे.