‘अफवांची धुळवड थांबवा अन् रहस्यकथांचा शेवट करा’, संजय राऊतांचा हल्लाबोल

आता तरी ही अफवांची धुळवड थांबवा आणि या रहस्यकथांचा शेवट करा, असे ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut tweeet)यांनी भाजपमधून पेरल्या जाणार्‍या बातम्यांवर हल्लाबोल केला आहे.

  मुंबई:आता तरी ही अफवांची धुळवड थांबवा आणि या रहस्यकथांचा शेवट करा, असे ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut tweeet)यांनी भाजपमधून पेरल्या जाणार्‍या बातम्यांवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  पवार-शाह यांच्यात गुप्त बैठक नाही

  राऊत म्हणाले, मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. तसेच, काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे, नाहीतर भ्रम निर्माण होतो. मी विश्वासाने सांगू शकतो की, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात अहमदाबाद किंवा कुठही गुप्त बैठक झालेली नाही. आता तरी अफवा संपवा, याने हाती काहीच लागणार नाही.


  त्यात काय नवल ?

  त्या अगोदर बोलताना संजय राऊत यांनी अमित शहा-पवार भेटीत फार काही राजकारण आहे, असे मला अजिबात वाटत नाही, असे म्हटले होते. अमित शाहांनी खरेच गुप्त ठेवले असते तर ती भेट बाहेर कशी आली असती? राजकारणात गुप्त असे काहीही नसते. गुप्त म्हणून आपण काही घडवायला गेलो, तर ते सगळ्यात आधी बाहेर पडते. असे देखील संजय राऊत म्हणाले होते. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. ते बर्‍याचशा भेटीगाठी अहमदाबादमध्ये देखील घेत असतात. शरद पवार देशातले महत्त्वाचे नेते आणि खासदार आहेत. जरी ते भेटले असतील, तरी त्यावर भुवया उंचावून हातभर जीभ बाहेर काढावी असे काय आहे? उलट देशात असा संवाद सतत व्हायला हवा. लोकशाहीचा तो फार मोठा अलंकार आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे होत होते. अटल बिहारी वाजपेयींपर्यंत हे होत होते. भिन्न विचारसरणीचे लोक राजकारणापलीकडे जाऊन भेटत होते, चर्चा करत होते, विचारविनिमय करत होते, असे त्यांनी म्हटले होते.

  अमित शाह यांची पवार यांच्याशी भेट ?

  शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा एका वर्तमानपत्रातील बातमीमुळे पसरली होती. या भेटीच्या वृत्तानंतर राज्याच्या आणि देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्याचे बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी तसे स्पष्ट केले होते. तर काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती.