ठाणे महापालिका आणि ठाणे ग्रामीण असा वाद चिघळणार – योगेश पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

भिवंडी: ठाणे जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोजच कोरोना रुग्णांची संख्या बेसुमार वाढत असून त्यातच पावसाळा सुरू असल्याने साथीचे आजार देखील वाढले आहेत. या  कोरोनाच्या महामारीमुळे ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागात रुग्णालयांची सुविधा अपुरी आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेला ठाणे शहर आरोग्य सुविधांसाठी जवळचे व सोयीचे आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करून पालिका प्रशासनाने फक्त स्थानिक रुग्णांवरच उपचार केले जातील शहाराबाहेरून आलेल्या रुग्णांना दाखल केले जाणार नाही ,असा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णांची परवड होत आहे.

या निर्णयाने ठाणे ग्रामीण भागातील जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात असून भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.या आंदोलनाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना योगेश पाटील म्हणाले की, ठाणे महापालिका प्रशासनाने शहराबाहेरील रुग्णांवर उपचारास नकार दिला आहे.त्याप्रमाणे त्यांनी ठाणे शहरातील नागरिकांच्या रोजगाराची ,पिण्याच्या पाण्याची तसेच दळणवळणाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करावी. ठाणे शहरातून हजारो कामगार भिवंडीत गोदामांमध्ये रोजीरोटीसाठी येत आहेत तर ठाणेकरांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन देखील शहापूर ,भिवंडीतून नेण्यात आली आहे.तसेच शहराला जोडणारे दळणवळणाचे रस्ते ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जोडलेले  आहेत. जर ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोना संकटकाळात ठाणे ग्रामीण जनतेवर लादलेला तुघलकी निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास ठाणे ग्रामीण जनता देखील जशास तसे उत्तर देऊन ठाणे शहरातील कामगारांना भिवंडीत येण्यापासून रोखू तसेच पाणी पुरवठा व ठाणे शहराला जोडणारे रस्ते बंद करून येत्या गुरुवारी ठाणे पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार योगेश पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या भूमिकेमुळे ठाणे महापालिका प्रशासन व ठाणे ग्रामीण असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.