अरविंद केजरीवाल यांची मागणी कोर्टाने फेटाळली, याचिकेवर तात्काळ सुनावणी नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. तसेच सक्तवसुली संचालनालयाकडून केजरीवाल यांच्या अटकेवर आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांना पुढील सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

    अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली. या कोठडी विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र त्यावेळी न्यायालयाने पुरेश्या पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना अटक केल्याचे सांगितले आणि त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले, अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापले जाणार नाही, असे चंद्रचूड म्हणाले. तसेच या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचा युक्तीवाद ॲड.अभिषेक मनू सिंघवी यांनी केल्यानंतर तुम्ही याचिकेच्या संदर्भात ई – मेल केला आहे का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली.

    आठवड्यातून दोनदा वकिलांना भेटण्याची परवानगी

    आठवड्यातून दोनदा वकिलांना भेटता येण्याची परवानगी द्यावी, ही याचिका अरविंद केजरीवाल यांनी राउज अव्हेन्यू न्यायालयात केली होती. मात्र त्यांची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यांच्या वकिलाला आठवड्यातून दोनदा भेटता यावं अशी परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात ३५ ते ४० खटले सुरु आहेत. खटल्यांच्या अनुषंगाने वकिलांशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे, असे अरविंद केजरीवाल यांचे वकील विकी जैन यांनी सांगितले आहे.

    पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची मागणी फेटाळली

    एखादी व्यक्ती तुरुंगातून सरकार चालविण्याचा पर्याय निवडत असेल तर त्याला अपवाद मानले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीला विशेषाधिकार दिले जाऊ शकत नाहीत, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. बैठकांचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जाऊ शकतो, असे देखील सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगामध्ये जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह यांनी केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.