सायबर पीडितांच्या मदतीसाठी सायबर वेलनेस हेल्पलाईन; ‘या ठिकाणी’ कॉल करून होईल झटक्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह

सायबर हल्ल्यांना (Cyber Attacks) बळी पडणाऱ्यांची आणि ऑनलाईनच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन मार्गाने आलेल्या संकटाचा सामना कसा करावा, कुठे मदत मागावी, यातून बाहेर कसे पडावे याची निश्चित माहिती नसल्याने आधीच गोंधळलेली व्यक्ती आणखीन घाबरून जाते.

  • ऑनलाईन संकटाचा सामना करण्यासाठी ७३५३१०७३५३ ही सायबर वेलनेस हेल्पलाईन सुरु
  • ‘रिस्पॉन्सिबल नेटीझम’ चा पुढाकार
  • मदत, मार्गदर्शन आणि समुपदेशन या तीन स्तरांवर या हेल्पलाईनचे काम चालणार

मुंबई : सायबर विश्वात (Cyber World) विविध प्रकारे सायबर हल्ले करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत खूपच वाढले आहे. एकीकडे सायबर जगतातील असुरक्षिततेतून मॉर्फिंग, हॅकींग, ऑनलाईन पाठलाग, आर्थिक फसवणूक यासारखे ऑनलाईन गुन्हे (Online Crime) वाढत आहेत तर दुसरीकडे सोशल मीडियाचा (Social Media) अतिरेकी वापर, सायबर विकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या वर्तणूकविषयक तसेच मानसिक समस्या प्रचंड वाढल्या आहेत.

सायबर हल्ल्यांना (Cyber Attacks) बळी पडणाऱ्यांची आणि ऑनलाईनच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन मार्गाने आलेल्या संकटाचा सामना कसा करावा, कुठे मदत मागावी, यातून बाहेर कसे पडावे याची निश्चित माहिती नसल्याने आधीच गोंधळलेली व्यक्ती आणखीन घाबरून जाते. मात्र आता यासंदर्भात योग्य मार्ग दाखवणारी आणि अशावेळी त्वरित काय पाऊले उचलावीत याविषयी माहिती देणारी ७३५३१०७३५३ ही सायबर वेलनेस हेल्पलाईन (Cyber Wellness Helpline) सुरु झाली आहे.

‘सायबर सुरक्षा’ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या ‘रिस्पॉन्सिबल नेटीझम’ (Responsible Netism) या संस्थेतर्फे ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून याचे लोकार्पण नुकतेच महिला आणि बालविकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

७३५३१०७३५३ क्रमांक असलेल्या या सायबर वेलनेस हेल्पलाईनवर सायबर गुन्ह्यांची तक्रार कुठे करावी याची माहिती, कायदेशीर माहिती, सहकार्य आणि पाठींबा व समुपदेशन अशी विविध प्रकारची मदत मिळणार आहे. सायबर गुन्ह्यांचे समाजावर होणारे गंभीर परीणाम लक्षात घेऊन अशावेळी काहीतरी मदत गरजूंना पटकन मिळावी आणि त्यांना पुढील मार्ग सापडावा या उद्देशाने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून मदत, मार्गदर्शन आणि समुपदेशन या तीन स्तरांवर या हेल्पलाईनचे काम चालणार आहे असे ‘ रिस्पॉन्सिबल नेटीझम’च्या संस्थापिका सोनाली पाटणकर यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्याच्या पीडितांना मानसिक आधाराची गरज असते विशेषत: सेक्सटोरशन, लोन ॲप्स द्वारे फसवणूक झालेले . याच बरोबर मुलांमध्ये अतिरिक्त मोबाइल वापरामुळे विविध प्रकारचे आजार बळावताना दिसत आहेत याबद्दलची मदत, समुपदेशन या सायबर वेलनेस हेल्पलाइनवर मिळणार आहे . ही हेल्पलाइन सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध असेल. हा क्रमांक व्हॉट्सॲप क्रमांक देखील आहे त्यामुळे आणीबाणीच्या वेळी मेसेजही करू शकता.