
जम्मू काश्मीरमधील एका गर्भवती महिलेवर तातडीने वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होतं. मात्र ती जम्मू-काश्मीरमधील केरन या भागात अडकली होती. कारण या भागात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला होता. तिथे जाऊन उपचार करण्यात डॉक्टरांना अडचण येत होती.
व्हॉट्स अॅप (Whats App) हा मेटाच्या मालकीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉइस कॉल्स, व्हिडिओ कॉल, चॅटींग आणि असंख्य गोष्टी आपण व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून करत असतो. करोडो भारतीय व्हॉट्स अॅपचा वापर करतात. मात्र याच whatsapp च्या मदतीने जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एका महिलेची प्रसूती करण्यात आली. नक्की काय घडलं जाणून घेऊयात. (Whats App Use For Delivery Of A Baby)
पीटीआयच्या एका अहवालानुसार, जम्मू काश्मीरमधील एका गर्भवती महिलेवर तातडीने वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होतं. मात्र ती जम्मू-काश्मीरमधील केरन या भागात अडकली होती. कारण या भागात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला होता. तिथे जाऊन उपचार करण्यात डॉक्टरांना अडचण येत होती. मात्र डॉक्टरांनी मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी एक वेगळाच पर्याय निवडला. तो पर्याय म्हणजे व्हॉट्स अॅप होय. व्हॉट्स अॅप कॉलद्वारे डॉक्टरांनी त्या गर्भवती महिलेला मदत केली.
क्रॅलपोराचे ब्लॉक वैद्यकीय अधिकारी डॉ. मीर मोहम्मद शफी यांनी सांगितलं की, शुक्रवारी रात्री या महिलेला कॅरेन पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र महिलेची एकूण परिस्थिती बघता तिला चांगल्या दवाखान्यात नेण्याची गरज आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्या महिलेला चांगल्या दवाखान्यात नेणे हे हिमवृष्टीमुळे शक्य नव्हते. जेव्हा कोणताच पर्याय डॉक्टरांसमोर उरला नाही तेव्हा त्यांना महिलेची काळजी घेण्यासाठी टेक्नॉलॉजीचा आधार घ्यावा लागला.
डॉ. परवेझ या स्त्रीरोगतज्ज्ञांनी डॉ. अरशद सोफी आणि त्यांच्या पॅरामेडिकल स्टाफला केरन पीएचसी येथे व्हॉट्स अॅप कॉलवर मुलाला जन्म देण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली. व्हॉट्स अॅप वरून त्यांनी मार्गदर्शन केले आणि शेवटी त्या महिलेनं निरोगी मुलाला यशस्वीरित्या जन्म दिला. सध्या मूल आणि आई दोघेही रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी महिलेच्या प्रसूतीसाठी व्हॉट्स अॅपचा वापर केला हे बघून आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या डॉक्टरांच्या प्रसंगावधानाचे कौतुकही होत आहे. आपल्या रुग्णाच्या काळजीसाठी डॉक्टरांनी उचललेले हे पाऊल वेगळे आहे.