या रक्षाबंधनाला ट्विटर युजर्सकडून घेणार एक प्रॉमिस, जाणून घ्या

कोरोना विषाणूच्या संक्रमणातून होणारी वाढ रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. अशातच सणांदरम्यान युजर्सने घराबाहेर पडू नये, सोबतच व्हर्च्युअल जगात एकमेकांशी कायम संपर्कात राहावं यासाठी ट्विटरने युजर्सला एक प्रॉमिस रक्षाबंधनाच्या निमित्ताने करायला सांगितलं आहे. युजर्सने आपल्या खास व्यक्तींसाठी #TweetAPromise हॅशटॅग वापरून काही लिहावं असं ट्विटरने सुचवलं आहे.

मुंबई : या रक्षाबंधनाला आपण एक प्रॉमिस करावं अशी इच्छा मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने व्यक्त केली आहे. हे प्रॉमिस कोरोना विषाणूचे होणारे संक्रमण पाहता अशा परिस्थितीत योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या महामारीच्या काळात सणांची रेलचेल सुरू झाली आहे पण सोशल डिस्टंसिंग राखणंही गरजेचं आहे. ट्विटरच्या मदतीने एकमेकांपासून लांब असलेल्या भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण अधिकच घट्ट होणार आहे. यासाठी ट्विटरने एक व्हर्च्युअल राखी आणली आहे.

भाऊ-बहिण यांनी या प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी संवाद साधायचा आहे किंवा एकमेकांसाठी मेसेज लिहायचा आहे. त्यांना यासाठी #TweetAPromise या हॅशटॅगचा वापर करायचा आहे. आपल्या अधिकृत ट्विटर इंडिया अकाउंटवर ट्विटरने एक ट्विट केलं आहे. यात लिहलं आहे, या रक्षाबंधनाला सुरक्षित अंतर ठेवा, ट्विटर इंडियाच्या व्हर्च्युअल राखीच्या मदतीने आपल्या खास व्यक्तीसाठी प्रॉमिस ट्विट (#TweetAPromise) करा.

संक्रमणापासून स्वत:ला वाचवणे गरजेचे

कोरोना विषाणूच्या संक्रमाणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि सणांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढू नये, यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वतीने एक आवाहन करण्यात आलं आहे. अशातच जर तुम्ही आपलं घर किंवा भाऊ-बहिणीपासून दूर आहात तर रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला एक प्रॉमिस करू शकता यासाठी  #TweetAPromise हॅशटॅग वापरण्याचे ट्विटरने सुचवले आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी हा हॅशटॅग ट्रेंड होण्याची शक्यता आहे.

मिळणार व्हर्च्युअल फीचर्स

टाळेबंदीच्या काळातही ट्विटर आपल्या युजर्सला आपापसात संपर्कात राहण्यासोबतच विषाणूशी संबंधित सामान्य माहिती आणि अपडेट्सही देत आहे. अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही अशाचप्रकारे आपल्या युजर्सला आवाहन करू शकतात आणि व्हर्च्युअली सण अधिकाधिक आनंददायक होण्यासाठी विशेष स्टिकर्स किंवा तात्पुरत्या स्वरुपाचे फीचर्स आणू शकतात. फेसबुकही अनेक सणांना अशाप्रकारचे ऑप्शन्स आपल्या युजर्सला देत असतो.