कल्याण डोंबिवलीत  १०१ रुग्णांची नोंद ; तिघांचा मृत्यू

कोरोना रुग्णांची संख्या २१७२ कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग तिसऱ्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १०१ रुग्ण आढळल्याने नागरिकांची

कोरोना रुग्णांची संख्या २१७२


कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग  तिसऱ्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १०१ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज तीन जणांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील ६६ वर्षीय पुरुष, टिटवाळा येथील ६८ वर्षीय पुरुषाचा आणि  ३७ वर्षीय किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाचा  समावेश आहे. 

केडीएमसी क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल १०१ नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १०१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २१७२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ६०  जणांचा मृत्यू झाला असून १०१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल १०७६  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून कोरोना रुग्णांना सुविधा देण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. अनेक रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात एडमीट न करता खाजगी रुग्णालयात जाण्याचा  सल्ला देण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, गरीब रुग्णांनी करायचं काय असा सवाल उपस्थित केला आहे.