भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर सोसायटीतील १२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

भिवंडी : कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यामुळे उध्वस्त झालेल्या हवालदिल शेतक-यास कर्जमाफी योजना राबवून दिलासा देण्याचे काम करीत असताना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर ग्रुप वि. का. सहकारी

  भिवंडी : कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यामुळे उध्वस्त झालेल्या हवालदिल शेतक-यास कर्जमाफी योजना राबवून दिलासा देण्याचे काम करीत असताना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर ग्रुप वि. का. सहकारी सोसायटीचे सभासद असलेल्या १२ शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याने हवालदिल झाले असून शासकीय अधिकारी ,लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देऊन न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत. भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर ग्रुप वि. का. सहकारी सोसायटीचे महाप ,कांदळी, मैंदे, दुधनी, कुसापूर ,मोरणी या गावातील शेतकरी सभासद असून त्यापैकी बबन पाटील, विश्वास पष्टे ,मोहन पाटील व इतर १२ शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु ते वेळेत न परत केल्याने थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्ज माफीचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार तहसीलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.   

या सर्व १२ शेतकऱ्यांनी सन २०१४ च्या आर्थिक वर्षात कर्ज घेतले होते ते २०१५ मध्ये थकबाकीदार झाले. सध्या एकूण १४ लाख ८ हजार ६८९ रुपये कर्ज थकबाकी असून या शेतकऱ्यांनी २०१६ मध्ये ऑनलाईन अर्ज केले असताना त्यांना याचा लाभ मिळाला नाही व त्यानंतर वसुलीसाठी कोणी न आल्याने कर्जमाफी झाल्याच्या भ्रमात राहिलेल्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी सोसायटी सह बँकांनी तगादा लावल्यावर शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली असल्याची माहिती कर्जदार शेतकरी लक्ष्मण बाबू शेलार यांनी दिली आहे. आम्ही अर्धशिक्षित शेतकरी असल्याने शासनाने आमच्या कर्जमाफीसाठी सुध्दा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.     

दरम्यान याबाबत पाच्छापूर ग्रुप वि. का. सहकारी सोसायटीचे सचिव सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान घेतलेल्या कर्जाच्या थकबाकी बाबत असून सदरच्या शेतकऱ्यांनी कर्ज उचलणी २०१४ मध्ये केली असून त्यानंतर २०१७ च्या कर्जमाफी योजनेत वन टाईम सेटलमेंट मध्ये कर्जमाफी वरील रक्कम एक रक्कमी भरण्याची मुभा होती त्या योजनेचा लाभ या शेतकऱ्यांनी न घेतल्याने ते सध्याच्या कर्ज माफी योजनेचा फायदा घेऊ शकले नाहीत अशी माहिती दिली.