हातात पैसे नसल्याने २३१ परप्रांतीय मजुरांनी चालत घर गाठण्याचा बांधला चंग – कल्याणच्या पोलिसांनी घेतले ताब्यात

कल्याण : कोरोनामुळे सुरू असणाऱ्या लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार गेले असून असेच रोजगार गेल्यामुळे चक्क पायी उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या सुमारे २३१ परप्रांतीय मजुरांना कल्याणच्या बाजारपेठ

 कल्याण : कोरोनामुळे सुरू असणाऱ्या लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार गेले असून असेच रोजगार गेल्यामुळे चक्क पायी उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या सुमारे २३१ परप्रांतीय मजुरांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परिणामी अनेक उद्योग-व्यवसाय गेल्या महिन्याभरापासून ठप्प पडल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. त्यातही यामध्ये परप्रांतीय मजूरांची संख्या बरीच मोठी आहे. राज्याच्या विविध भागातून मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या पद्धतीने लपून छपून हे परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांत असे अनेक प्रकार समोर आले असून काहीसा असाच प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकातून अनेक जण पायी चालत बिहार, उत्तरप्रदेशला जात असल्याचे आढळल्यानंतर या सर्व मजुरांना कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान परिसरात आणून महापालिका आरोग्य विभागामार्फत त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली. हे सर्व जण टाटा पॉवर,सोनारपाडा, पांडुरंगवाडी, गोळवली  परिसरातील चाळींमध्ये राहत असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

दरम्यान या सर्वांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात कल्याणमधील महाजन वाडी आणि महावीर हॉलमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रभाग अधिकारी किशोर खुताडे यांनी दिली. तर लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने खायचे काय हा प्रश्न होता, ज्या कंत्राटदाराकडे कंपनीत काम करतो त्याने देखील आपला फोन बंद करत मदत करण्यास असमर्थता दर्शवली असून या महिन्याचा पगारदेखील कंपनीत अडकला आहे.  किराणावाला अन्न धान्य द्यायला तयार आहे मात्र त्याला द्यायला पैसे नसल्याने आम्ही आमच्या मुळगावी जाण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक कुमार या मजुराने सांगितले.